

कोल्हापूर : ‘सारथी’च्या पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. राज्य शासनाने बार्टी संस्थेतील नियमाप्रमाणेच कायम नोंदणी झालेल्या ‘सारथी’च्या 969 पात्र विद्यार्थ्यांना शंभर टक्के अधिछात्रवृत्ती देण्यास अखेर मान्यता दिली आहे. त्यामुळे ‘सारथी’च्या विद्यार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
मागील दीड वर्षापासून राज्यातील सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी नोंदणी दिनांकापासून सर्व पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळावी यासाठी कोल्हापूर, आझाद मैदान, मुंबई, नागपूर, पुणे, फुलेवाडा ते विधान भवन पायी लाँग मार्च अशी विविध आंदोलन केली. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत 25 जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व संशोधक विद्यार्थ्यांना 50 टक्के दराने फेलोशिप देण्याचा निर्णय झाला; परंतु बार्टी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केल्यामुळे 25 ऑगस्टला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘बार्टी’च्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के फेलोशिप देण्याचा निर्णय झाला.
त्यामुळे इतर संस्थांच्या विद्यार्थांमध्ये अन्यायाची भावना होती. याबाबत दै.‘पुढारी’ने वारंवार विषय मांडून त्याचा वाचा फोडली होती. त्यानंतर सारथी कार्यालय, पुणे येथे सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी गेले 26 दिवस उपोषण सुरू केले. शेवटी सारथी, बार्टी, महाज्योती या तिन्ही संस्थांतील विद्यार्थ्यांना समान धोरणानुसार शंभर टक्के फेलोशिप नोंदणी दिनांकापासून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. नियोजन विभागाने याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी (दि. 4) जारी केला आहे.