कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी बुधवारी अखेरच्या दिवशी चुरशीने उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. यामुळे जिल्ह्यातील सर्वच निवडणूक कार्यालयांना जत्रेचे स्वरूप आले होते. जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी एकूण 593 उमेदवारांचे 720 तर 12 पंचायत समितीच्या एकूण 136 जागांसाठी एकूण 1107 उमेदवारांचे 1333 अर्ज दाखल झाले. दाखल अर्जांची गुरुवारी छाननी होणार आहे. मंगळवार, दि. 27 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. दि. 5 फेब—ुवारीला मतदान होणार आहे. यासाठी दि. 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली. अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी दि. 16 रोजी जिल्हा परिषदेसाठी गडहिंग्लज तालुक्यातून एकच अर्ज दाखल झाला होता. दुसर्या दिवशी दि. 17 रोजी राधानगरी तालुक्यातून पंचायत समितीसाठी एका उमेदवाराचा एक अर्ज दाखल झाला होता. दि. 19 रोजी तिसर्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी 41 उमेदवारांचे 56, तर पंचायत समितीचे 42 उमेदवारांचे 56 अर्ज दाखल झाले होते. मंगळवार, दि. 20 रोजी जिल्हा परिषदेसाठी 207 जणांनी 252, तर पंचायत समितीसाठी 260 जणांचे 314 अर्ज दाखल झाले.
बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. यामुळे सकाळपासूनच निवडणूक कार्यालयात उमेदवारांची समर्थक, कार्यकर्त्यांसह गर्दी होत होती. अनेकजण शक्ती प्रदर्शन करत सहकुटुंब उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यालयाकडे येत होते. महिला उमेदवारांसमवेत महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. सकाळी अकरा वाजल्यापासूनच निवडणूक कार्यालयाचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. दुपारी तीन वाजता कार्यालयाचे दरवाजे बंद करण्यात आले. तत्पूर्वी जे जे रांगेत होते, त्यांना कार्यालयात घेण्यात आले. नंतर त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले.
सूचकाचा प्रवेश अन् वाद
उमेदवारी अर्ज भरताना गर्दीच्या ठिकाणी उमेदवार आणि एकाच सूचकाला आत सोडले जात होते. अर्ज भरण्यासाठी कार्यालयात सोडण्यावरून कार्यकर्ते आणि पोलिसांत वारंवार वादावादी होत होती. त्यामुळे अर्ज भरताना परस्पर विरोधक आपल्या कार्यकर्त्याला का बाहेर काढता, असे म्हणत पोलिस, प्रशासनाकडे विचारणा करत होते. यामुळेही वादावादीचे प्रसंग घडत होते.