

अनुराधा कदम
कोल्हापूर : गर्भातील मुलीचा जीव एका क्षणात जात नाही, तर तिच्या हत्येची सुरुवात होते एका फोनपासून जो दलालाला जोडला जातो. त्याने हेरलेल्या दाम्पत्याशी संपर्क होतो. नंतर सुरू होतो बेकायदेशीर सोनोग्राफीचा खेळ, मुलगा की मुलगी यासाठी वापरल्या जाणाऱ्या सांकेतिक भाषेतील संवाद; मग आर्थिक व्यवहाराची बोलणी आणि त्यानंतर अवैध मार्गाने मिळवलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांचा डोस देऊन स्त्रीभ्रूणाचे अस्तित्व संपवले जाते.
दोन वर्षांत ३०० हून अधिक स्त्रीभ्रूणांच्या हत्येच्या कबुलीने डॉ. चंद्रकांत गायकवाड याने या रॅकेटचा चेहरा उघड केला. दलालांची साखळी, बेकायदेशीर यंत्रसामग्रीचा वापर, औषधांचा पुरवठा आणि तपास यंत्रणेचे मौन या चार टप्प्यांत उभारलेले हे ‘डेथ नेटवर्क’ गर्भातल्या जीवांचे खून करत आहेत.
पहिला टप्पा : ‘गिर्हाईक’ हेरणारे दलाल
मुलगाच हवा असलेल्या कुटुंबांचा विश्वास संपादन करणे, डॉक्टरांपर्यंत गुप्तपणे पोहोचवणे, तपासणीच्या वेळा ठरवणे आणि ‘व्यवस्था होईल’ अशी खात्री देणारे दलाल ‘गिऱ्हाईक’ हेरतात. याच ठिकाणी अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात व्यवहाराचे मूळ आहे. रुग्ण आणि बेकायदेशीर केंद्र यांची गाठ घालून देणाऱ्या दलालांनी ही यंत्रणा बोकाळलेली आहे.
दुसरा टप्पा : बेकायदेशीर सोनोग्राफी मशिनचा पुरवठा
गर्भलिंग निदानासाठी सोनोग्राफी मशिनचा नियमांनुसार वापर केवळ नोंदणीकृत केंद्रांनाच करता येतो. तरीही मशिन एकीकडून दुसरीकडे हलवून, कागदोपत्री फेरफार केले जातात? बोगस नोंदी केल्या जातात. सगळेच आलबेल असेल तर धाक बसणार कसा, अशी अवस्था आहे.
तिसरा टप्पा : गर्भपाताच्या गोळ्यांचे ‘सेटिंग’
कायद्यानुसार गर्भपाताची औषधे डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय विकता येत नाहीत; पण या नियमाला गुंडाळून काही मेडिकल औषध दुकानदार औषधांची, तसेच किटची विक्री करत आहेत. ऑनलाईन साईटवरूही ही औषधे घरपोच मिळतात. सहजपणे उपलब्ध होणाऱ्या साधनसामग्रीवरच घाव घातला, तर गर्भातल्या मुलींचे गळे घोटले जाणार नाहीत.
चौथा टप्पा : मौन बाळगणारी यंत्रणा
गेल्या दोन वर्षांपासून भरवस्तीतील एका घरात गर्भपाताचे बेकायदेशीर धंदे सुरू होते, ठरावीक दिवसांच्या अंतराने दाम्पत्य किंवा महिलांची ये-जा असण्याची खबर पोलिसांपर्यंत पोहोचलीच नाही. एवढी मोठी साखळी सुरू असताना संबंधित यंत्रणांना त्याची माहिती नव्हती. आरोग्य विभाग, औषध प्रशासन, महापालिकेची आरोग्य यंत्रणा आणि पोलिस तपासणी व्यवस्था सुस्त होती.