

गांधीनगर : जन्मदात्या बापानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उचगाव (ता. करवीर) येथे उघडकीस आला. पीडित मुलींच्या आईने याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा नोंद झाला आहे. त्यानुसार नराधमाला गांधीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी, नोव्हेंबर २०२५ पासून हा नराधम आपल्या पोटच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता. या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. तसेच मुलींना शिवीगाळ, मारहाणही केली जात होती. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलींना संरक्षणही देण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून नेमके अत्याचार किती काळ सुरू होते यासह या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींचा शोध घेतला जात आहे.
परिसरात संतापाची लाट
या अमानुष घटनेमुळे उचगाव परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल कदम व पोलीस हवालदार मीनाक्षी शिंदे करत आहेत.