

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासाठी सोमवार ( दि.२३) ‘घातवार’ ठरला. जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या चार अपघातांत चार जणांचा मृत्यू झाला. केर्ले -कोतोली-नांदगाव मार्गावर दुचाकीने ट्रकला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार सराफ व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. इचलकरंजी-शिरदवाड मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरून दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. तर कुरुंदवाड-तेरवाड मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाची जोरदार धडक होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. तसेच तिलारी घाटात दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला.
दुचाकीची ट्रकला धडक, सराफ व्यावसायिकाचा जागीच मृत्यू
पोर्ले तर्फ ठाणे : केर्ले-कोतोली-नांदगाव मार्गावर पेट्रोल पंपाजवळ दुचाकीने ट्रकला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सुनील ऊर्फ नामदेव दिनकर कुंभार (वय ५५, मूळ रा. पुनाळ. सध्या रा. अयोध्या कॉलनी, रिंग रोड, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव कुंभार यांचा सोन्या-चांदीचा व्यवसाय आहे. ते आठवड्यात दोन वेळा पुनाळ येथे गावी जाऊन घरगुती व्यवसाय करीत होते. सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून केर्ले-कोतोली- नांदगाव मार्गावरून पुनाळला जात होते. दरम्यान, केर्ले येथील एका पेट्रोल पंपाजवळ बालिंगेहून रत्नागिरीला जाणाऱ्या ट्रकला त्यांनी जोरदार धडक दिली. या धडकेत कुंभार यांच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक एवढी जोरात होती की, धडकेत दुचाकी चक्काचूर झाली आहे. दरम्यान, अपघातानंतर पसार झालेला ट्रकचालक सैफन मलिक रा.शिवंगी, विजापूर, कर्नाटक) पोलिस ठाण्यात हजर झाला. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. मृत कुंभार यांच्या मागे पत्नी, आई-वडील, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, दोघे गंभीर
कुरुंदवाड : कुरुंदवाड-तेरवाड मार्गावरील ऐश्वर्या हॉटेलजवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनाची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात साकीब भिलवडे (वय १९, मूळ रा. चिक्कोडी, जि. बेळगाव, सध्या रा. कुरुंदवाड) याचा मृत्यू झाला. तर सलमान बाणदार (वय २०) आणि सोहेल मतवाल (वय २५) हे दोघे गंभीर जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत अपघाताची पोलिसांत नोंद झाली नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तिघेही दुचाकीवरून कुरुंवाड-तेरवाड मार्गावरून जात असताना ऐश्वर्या हॉटेलजवळ दुचाकीची चारचाकी वाहनाशी जोरदार धडक झाली. या अपघातात साकीब गंभीर जखमी झाला. त्याला सांगली येथील भारती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सलमान बाणदार याच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात, तर सोहेल मतवाल याच्यावर जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिलारी घाटात दुचाकी अपघातात सिंधुदुर्गच्या युवकाचा मृत्यू
चंदगड : बेळगाव येथून पाटणे फाटा-हेरे मार्गाने तिलारी घाटातून पुढे जात असताना वीज घराजवळ दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून अपघात झाला. या घटनेत दुचाकीचालक अखिल जोसेफ चालील (वय २४, रा. साटेली, भेडशी, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) याचा मृत्यू झाला. याबाबतची वर्दी बेनिथ इलियास फर्नांडिस ( रा. साटेली, भेडशी, ता. दोडामार्ग ) यांनी चंदगड पोलिसांत दिली. घटनास्थळावरून अखिल याला तातडीने बांबोळी-गोवा येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल ए. बी. बांबळे करत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक जखमी
कुरुंदवाड : इचलकरंजी-शिरदवाड मार्गावर इचलकरंजी पुलाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला. रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात तुषार आप्पासो पाटील (वय ३९, रा. थोरात चौक, इचलकरंजी) यांचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार संदीप आप्पाजी लोखंडे (वय २८, रा. मंगळवार पेठ, इचलकरंजी) जखमी झाले. या प्रकरणी जखमी लोखंडे यांनी कुरुंदवाड पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप लोखंडे हे आपले मित्र तुषार पाटील यांच्यासह दुचाकीवरून इचलकरंजीहून शिरदवाडकडे जात होते. शिरदवाड हद्दीत समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघेही जखमी झाले. उपचारादरम्यान तुषार पाटील यांचा मृत्यू झाला. धडकेत दुचाकीचेही नुकसान झाले. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.