

सोलापूर : शेतकर्यांना एक आंनदाची बातमी असून बँकेत न जाताही त्यांना आता पीक कर्ज मिळणार आहे. जनसमर्थक पोर्टलवर सर्वप्रथम शेतकर्यांनी नोंदणी करावी. त्यानंतर कर्ज मागणीचा अर्ज केल्यानंतर संबंधित बँकेकडे कर्जदाराचे अर्ज ऑनलाईन जातील. त्यानंतर त्वरेने कर्ज मिळणार आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा मिळणार आहे.
शेतकर्यांना पीक कर्ज मिळविण्यासाठी अनेकदा बँकेची पायरी चढावी लागते. बँका कर्ज प्रकरणाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून त्याची व्यवस्थित पूर्तता करण्याची सूचना देतात. त्यामुळे शेतकर्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी शासनाने आता जनसमर्थक पोर्टलची निर्मिती केली आहे. या पोर्टलवर कर्जदाराने नोंदणी करावी.
त्यानंतर कर्ज मागणीविषयक अर्ज ऑनलाईनच भरावा. दरम्यान, शेतकर्यांकडून ई-सेवा व सेतू सुविधा केंद्रात पीक कर्ज मागणीचा अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे भरून घेण्यात येत आहे. संबंधित इच्छुक पात्र कर्जदार शेतकर्यांना एका तासात कर्ज मंजुरी मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. शासनाच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात हा प्रयोगशील उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
विशेष तपशील...
* जनसमर्थक या नावाने शेतकर्यांना पीक कर्ज वाटपासाठी प्रशासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
* शेतकर्यांचा फॉर्मर आयडी, आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल क्रमांक आदी संकलित करून त्यानुसार पात्र प्रस्ताव बँकांकडे कर्जासाठी पाठविण्यात येणार.
* कागदपत्रांची पडताळणी करूनच बँकेकडे ऑनलाईन प्रणालीने कर्ज प्रकरण जाणार असल्याने बँकांना आता कर्ज नाकारता येणार नाही.