

नवे पारगाव : शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेच्या अनुषंगाने जमिनींचे सीमांकन करण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील मौजे पारगाव येथे रविवारपासून ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार होते. मात्र, शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिवसभर एकही अधिकारी, सर्वेक्षण कर्मचारी अथवा पोलिस फिरकलेच नाहीत. त्यामुळे नियोजित ड्रोन सर्वेक्षण झाले नाही .
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या मोनार्क सर्व्हेअर कंपनीकडून इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे यांच्या २३ नोव्हेंबर रोजीच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात रविवारी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार होते. मात्र, या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी वारणा परिसरातील शेतकरी आधीपासूनच सज्ज होते. प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली होऊ नयेत, यासाठी शेतकऱ्यांनी गाफील न राहता परिसरातील विविध ठिकाणी गनिमी काव्याने ठिय्या मांडला होता. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शेतकरी सर्वेक्षणाच्या संभाव्य हालचालींवर लक्ष ठेवून होते.
यावेळी नितीन हुजरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संपत पवार, शेतकरी-शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष वैभव कांबळे, प्रकाश मोरे, संभाजी चरणे, बबन हुजरे, प्रताप पाटील, सुनील सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.