Shaktipeeth Expressway | 'शक्तिपीठ'विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; गारगोटीत प्रांताधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

Shaktipeeth Expressway |
गारगोटी : भुदरगड तालुक्यात शक्तिपीठ महामार्गविरोधात भव्य मोर्चा काढला. यावेळी सहभागी झालेले शेतकरी.
Published on: 
Updated on: 

गारगोटी : शक्तिपीठ महामार्गाच्या मॅपिंगविरोधात कोनवडे येथे संतप्त शेतकऱ्यांनी मॅपिंग मशिन पेटवून दिले, तर म्हसवे येथे मॅपिंगसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले. या घटनांच्या पार्श्वभूमीवर गारगोटी येथे भुदरगड प्रांत कार्यालयावर शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांनी भव्य आक्रोश मोर्चा काढून शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शविला.

मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. 'एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द', `जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची`, `या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय` अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गारगोटी शहरात पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता. विकासाच्या नावाखाली आमच्या जगण्याचा आधार हिरावून घेऊ नका, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली. यावेळी कॉ. सम्राट मोरे, मच्छिंद्र मुगडे, गोकुळचे संचालक राहुल देसाई, सत्यजित जाधव, जिल्हा परिषद सदस्या रेश्मा देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार, बिद्री कारखान्याचे संचालक मधुकर देसाई, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, प्रकाश पाटील, जीवन पाटील, विजय देवणे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तीव्र रोषामुळे ­पथक माघारी

म्हसवे येथील शेतकऱ्यांकडून मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना किरकोळ मारहाण करण्यात आली. या घटनेने प्रशासनाच्या पथकात एकच धावपळ उडाली. संतप्त शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून मोनार्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावातून बाहेर पडावे लागले. अखेर मोजणीचे काम बंद पडले आणि प्रशासनाच्या पथकाला माघारी फिरावे लागले.

जमिनीच्या रक्षणासाठी आर्त हाक

प्रांत कार्यालयासमोर भरउन्हात शेतकरी आपल्या जमिनीच्या रक्षणासाठी ठाण मांडून बसले होते. डोक्यावर रणरणते ऊन, डोळ्यांत भविष्याची चिंता आणि मनात जमीन वाचविण्याची जिद्द, असे भावनिक चित्र आंदोलनस्थळी पाहायला मिळाले.

बोरवडे, उंदरवाडी येथील ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या

बिद्री : नियोजित शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी सरकारी यंत्रणा येणार असल्याचे समजताच बोरवडे आणि उंदरवाडी ग्रामस्थांनी निपाणी- राधानगरी मार्गावर बोरवडे फाट्यावरील रस्त्यावरच ठिय्या मांडला.

बोरवडे फाटा क्रमांक दोनवर बोरवडे आणि उंदरवाडी येथील सुमारे दोनशे ते तीनशे ग्रामस्थ सरकारच्या विरोधात घोषणा देत मुख्य मार्गावरच सुमारे तासभर ठिय्या मांडून बसले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी आपला मोर्चा बोरवडे येथील जोतिबा मंदिर चौकात वळविला. तेथे सभा घेऊन कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ द्यायचा नाही, असा निर्धार व्यक्त करत शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला.

यावेळी बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, दत्तात्रय चव्हाण, डॉ. रमेश चौगले, दयानंद सूर्यवंशी, अशोक कुदळे यांच्यासह बोरवडे, उंदरवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.