

कोल्हापूर : शेतकर्यांना आता घरबसल्या खत खरेदी करता येणार आहे. याकरिता त्यांना ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय खत विक्री आराखडा (एनएसएफएस) अंतर्गत नवीन ऑनलाईन खत बुकिंग प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामुळे शेतकर्यांना घरातून खत आरक्षित करता येणार आहे. यामुळे खतासाठी रांगा लावणे, दुकानात हेलपाटे मारणे बंद होणार आहे.
रासायनिक खत वेळेत, पारदर्शक व सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाने ही प्रणाली विकसित केली आहे. या नवीन डिजिटल प्रणालीद्वारे शेतकरी मोबाईल अॅप, सीएससी केंद्र, पीएसीएस संस्था, सहकारी संस्था किंवा अधिकृत खत विक्रेते यांच्या माध्यमातून ऑनलाईन खत आरक्षित करू शकणार आहेत. शेतकर्याने अर्ज केल्यानंतर संबंधित दुकानातील उपलब्ध साठ्यानुसार क्यूआर कोड किंवा टोकन क्रमांक दिला जाणार आहे.