

कोल्हापूर : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अवीट संगीताने रसिकांच्या हृदयावर राज्य करणारे सुप्रसिद्ध गायक - संगीतकार अजय-अतुल कोल्हापुरात एक खास संगीतमय मेजवानी घेऊन येत आहेत. अजय अतुल यांच्या लाईव्ह शोसाठी उत्साह शिगेला पोहोचला आहे. दुर्गा मां एंटरटेन्मेंटने या भव्य शोचे आयोजन केले असून दैनिक ‘पुढारी’ माध्यम प्रायोजक आणि टोमॅटो एफएम रेडिओ पार्टनर आहेत. महासैनिक दरबार येथे दोन फेब्रुवारी 2025 रोजी हा शो होणार आहे.
हा शो म्हणजे केवळ एक संगीताचा कार्यक्रम नाही, तर एक सांगीतिक पर्वणी असेल. महासैनिक दरबार या भव्य स्थळी तब्बल 17,000 प्रेक्षकांसाठी या शोचे आयोजन केले असून, प्रशस्त पार्किंगसह मोठी सुरक्षा व्यवस्था, उत्तम व्यवस्थापनासाठी 2000 हून अधिक लोक काम करणार आहेत. कोल्हापूरकरांना पहिल्यांदाच पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात आयोजित केल्या जाणार्या कार्यक्रमाच्या तोडीचा अनुभव मिळणार आहे.
अजय-अतुल हे नाव मराठी आणि हिंदी संगीत विश्वात एक ब्रँड बनले आहे. ‘सैराट’ या मराठी चित्रपटासाठी दिलेले ‘झिंगाट’ हे गाणे किंवा ‘मोरया मोरया’पासून ते ‘माऊली’पर्यंतची त्यांनी दिलेल्या सुमधूर आणि जोशपूर्ण गाणी रसिक मनावर अधिराज्य गाजवत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतही ‘अग्निपथ’सारख्या चित्रपटातील गाणे देवा श्री गणेशा किंवा ‘चिकनी चमेली’सारखी गाणी त्यांना बॉलीवूडचे स्टार संगीतकार बनवतात. त्यांच्या लाईव्ह शोमध्ये केवळ गाण्यांचे स्वरच नाही, तर त्यांचे संगीतातील वेगवेगळे प्रयोग, भाव भावनांची गुंफण आणि चाहत्यांशी असलेला त्यांचा अद्वितीय बॉन्ड अनुभवायला मिळणार आहे. या शोसाठी कोल्हापूर व परिसरातील लोकांनी तिकीट खरेदीला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे तिकीट बुकिंगसाठी क्यूआर कोडची सुविधा दिल्यामुळे त्याचा वापर करून लोक मोठ्या संख्येने तिकिटे बुक करत आहेत.
दोन फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता होणारा हा लाईव्ह शो संगीतप्रेमींसाठी एक पर्वणी ठरेल यात शंका नाही. या कार्यक्रमासाठी आपला वेळ राखून ठेवावा, असे आवाहन दुर्गा मां एंटरटेन्मेंटचे योगेश गायकवाड यांनी केले आहे. कार्यक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी आणि तिकीट बुकिंगसाठी क्यूआर कोड स्कॅन करा.