Kolhapur Land Fraud Case: उपजिल्हाधिकाऱ्यांचा बनावट आदेश, खोटा शिक्का वापरून १२ एकर सरकारी जमीन विकली

मुगळी येथील एकावर गुन्हा दाखल; २९ लाखांना केली परस्पर विक्री
Fraud Case
Fraud CasePudhari
Published on
Updated on

चंदगड : जिल्हाधिकारी कार्यालयाचा बनावट शिक्का आणि खोटी डिजिटल स्वाक्षरी वापरून उपजिल्हाधिकाऱ्यांचा बनावट आदेश तयार करण्यात आला. हा आदेश चंदगड तहसील कार्यालयात सादर करून मळवीवाडी (ता. चंदगड) येथील तब्बल १२ एकर सरकारी जमीन वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्यात आली. त्यानंतर ही कोट्यवधी रुपये किमतीची जमीन परस्पर २९ लाख रुपयांना तिसऱ्या व्यक्तीला विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुगळी (ता. चंदगड) येथील तातोबा भिकाजी गावडा (वय ४२) याच्याविरुद्ध चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रभारी नायब तहसीलदार शशिकांत बापुसाहेब किल्लेदार (वय ५१, सध्या रा. हरळी खुर्द, ता. गडहिंग्लज) यांनी फिर्याद दिली आहे. मागील सुमारे दहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

मळवीवाडी गावातील गट क्रमांक २३० ही जमीन शासनाच्या मालकीची आहे. तातोबा गावडा याने जिल्हाधिकारी कार्यालयाचा बनावट शिक्का तसेच खोटी डिजिटल स्वाक्षरी वापरून अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट आदेश तयार केला. हा आदेश खरा असल्याचे भासवून तो चंदगड तहसील कार्यालयात सादर करण्यात आला. त्याद्वारे वर्ग-२ मधील सरकारी जमीन वर्ग-१ करण्यात आली.

त्यानंतर ही जमीन विलास गणपती पाटील, अरुण गणपती पाटील, नारायण गणपती पाटील आणि परशराम गणपती पाटील (सर्व रा. तुडये, ता. चंदगड) यांच्या नावे करण्यात आली. शासनाची फसवणूक करून कोट्यवधी रुपये किमतीची १२ एकर जमीन नोंदणीकृत खरेदीखताद्वारे २९ लाख रुपयांना तिसऱ्या व्यक्तीला विकण्यात आली.

हा संपूर्ण प्रकार माहितीच्या अधिकारातून उघडकीस आला. त्यानंतर प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील पोवार करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news