शहरासह सीमाभागात पाचशेच्या बनावट नोटांचे ‘गिफ्ट’!

हुबेहूब छपाई; वितरणासाठी सराईत टोळ्यांची यंत्रणा सक्रिय : स्थानिक गुंडांशीही लागेबांधे
Fake Rs 500 notes found in city and border areas
शहरासह सीमाभागात पाचशेच्या बनावट नोटांचे ‘गिफ्ट’!Pudhari File Photo
Published on
Updated on
दिलीप भिसे

कोल्हापूर : पाचशे रुपयांच्या बनावट नोटांची हुबेहूब छपाई करून बाजारपेठांमध्ये चलनात आणून बक्कळ कमाईला सोकावलेल्या सराईत टोळ्यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह कोकण, उत्तर कर्नाटकात धुमाकूळ घातला आहे. फरार संशयित अभिजित रामचंद्र पवार (40, रा. गडमुडशिंगी, मूळ गाव निपाणी, जि. बेळगाव) हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत आहे. राजारामपुरी येथील त्याच्या गिफ्ट सेंटरमधील बॉक्समधून बनावट नोटांचे पार्सल टोळ्यांना पुरविण्याचा गोरखधंदा चव्हाट्यावर आला आहे.

जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या यंत्रणेशिवाय स्थानिक गुन्हे अन्वेषणमार्फत बनावट नोटा प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. मूळचा निपाणीचा, पण काही वर्षांपासून गडगुडशिंगी (ता. करवीर) व राजारामपुरी येथील सहाव्या गल्लीत वास्तव्याला असलेल्या अभिजित राजेंद्र पवार (40) या सराईताचे नाव निष्पन्न झाले आहे. तो बनावट नोटा प्रकरणातील गुन्ह्यात सराईत असल्याची माहितीही पुढे आली आहे.

4.45 लाखांच्या बनावट नोटा हस्तगत

तत्कालीन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या काळात 2023 मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणने कोल्हापूर-गगनबावडा रोडवर मरळी फाटा येथील कारवाईत अभिजित पवारसह चारजणांना जेरबंद करून पाचशे व शंभर रुपयांच्या 4 लाख 45 हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या. याप्रकरणी कळे (ता. पन्हाळा) पोलिस ठाण्यात पवारसह संदीप कांबळे (रा. कळे, पन्हाळा), चंद्रशेखर पाटील (तारळे, राधानगरी), दिग्विजय पाटील (शिरोली पुलाची) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

संशयित संदीप कांबळे हा आधार केंद्रात काम करीत होता. फोटोशॉपद्वारे काम करताना त्याने नोटांची हुबेहूब नक्कल करण्यास सुरुवात केली. एका आर्थिक गुंतवणुकीत तोट्यात आल्याने त्याने बनावट नोटांची छपाईच घरी सुरू केली. छपाई केलेल्या बनावट नोटा तो अभिजित पवारसह साथीदारांकडे देत होता. पाच महिने हा कमाईचा फंडा सुरू होता. यावेळी संशयिताकडून बनावट नोटा मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आल्या होत्या.

गिफ्ट सेंटर बंद; खोलीला कुलूप!

अभिजित पवार सध्या फरार आहे. कळे कारवाईनंतर काही काळाने त्याने राजारामपुरी येथील गिफ्ट सेंटर बंद केले. गडमुडशिंगी येथील भाड्याच्या खोलीला कुलूप ठोकून तेथील वावर कमी केला. निपाणीचा संपर्क कमी करून त्याची कोल्हापूरसह रायबाग, चिक्कोडी, बेळगाव, कागल, मुरगूड परिसरात उठबस सुरू झाल्याची माहितीही पोलिसांच्या चौकशीतून पुढे येत आहे.

नोटा घरात ठेवल्याचे निष्पन्न

शिवप्रसाद कदमने पवारकडूनच बनावट नोटा घेऊन स्वत:च्या घरी ठेवल्या होत्या, असे तपासाधिकारी तथा पोलिस निरीक्षक संजीव झाडे व गुन्हे शोध पथकाचे प्रमुख संतोष गळवे यांनी दिली. अभिजित पवारसह चारही संशयितांविरुद्ध वेगवेगळ्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. अमोल पोतदारविरुद्ध जुना राजवाडा, सरगर याच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात तर कदम याच्याविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचेही तपासाधिकार्‍यांनी सांगितले.

बनावट नोटांची बेधडक डिलिव्हरी !

मरळी फाट्यावरील बनावट नोटा प्रकरणात जामिनावर सुटका झाल्यानंतर अभिजित पवार याने स्वत:चा मिळकतीचा फंडा सुरू केला. तत्पूर्वी त्याने राजारामपुरी येथील सहाव्या गल्लीत गिफ्ट सेंटरचे दुकान सुरू केले. या प्रकरणातील अन्य संशयिताची गिफ्ट सेंटरमध्ये ऊठबस सुरू झाली. झटपट कमाईसाठी पवारने गिफ्ट सेंटरमधून बनावट नोटांचा व्यवहार सुरू केला. गिफ्ट सेंटरच्या बॉक्समध्ये बनावट नोटांचा भरणा करून त्याची साथीदारांना डिलिव्हरी सुरू केल्याची माहितीही जुना राजवाडा पोलिसांच्या चौकशीतून पुढे येऊ लागली आहे.

कोल्हापूरसह कर्नाटकातील बाजारपेठ हादरली !

बँकेच्या डिपॉझिट मशिनमध्ये बनावट नोटांचा भरणा करणार्‍या अमोल गणपती पोतदार (47, रा. डाकवे गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर) याच्यासह त्याला बनावट नोटा पुरविणार्‍या निखिल किशन सरगर (30, करगणी, आटपाडी, जि. सांगली), शिवप्रसाद दिलीप कदम (25, वारणा कापशी, ता. शाहूवाडी) यांना जुना राजवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पाचशे रुपये मूल्य असलेल्या नोटांची छपाई करून बाजारपेठांमध्ये बेहिशेबी नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणारी टोळी पोलिसांच्या हाताला लागल्याने कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र, कोकण व उत्तर कर्नाटकात टोळ्यांच्या कारनाम्याची चर्चा रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news