False picture of Gulf War | कृत्रिम चित्रफितीद्वारे रंगवले आखाती युद्धाचे खोटे चित्र

अरबमध्ये वास्तव्यास असलेल्या अनफवाडीकरांनी केली ‘या’ कथित व्हिडीओची पोलखोल
False picture of Gulf War |
कृत्रिम चित्रफितीद्वारे रंगवले आखाती युद्धाचे खोटे चित्र
Published on
Updated on

रविराज वि. पाटील

गारगोटी : सोशल मीडियावर एआयच्या सहाय्याने तयार केलेले कथित व्हिडीओ व्हायरल करून युद्धाचे भीषण चित्र रंगवले जात असले, तरी प्रत्यक्षात आम्ही येथे सुखरूप आहोत, अशा भावना अरब देशांत वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. अफवा आणि वास्तव यात फरक ओळखण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

अनफवाडी येथील सायमा शेख या आयटी इंजिनिअर असून त्या सध्या पतीसमवेत शारजा येथे वास्तव्यास आहेत. त्या सांगतात, आकाशातून जाणारी काही मिसाईल नजरेस पडतात. काही ड्रोन हवेतच नष्ट केले जातात. त्यांचे तुकडे जमिनीवर किंवा इमारतींवर पडतात; मात्र त्या द़ृश्यांचे अतिरंजित व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर भिती पसरवली जात आहे. येथील संरक्षण व्यवस्था अत्यंत सक्षम असून नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. वेळोवेळी मोबाईलवर अलर्ट संदेश पाठवून नागरिकांना सतर्क केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आरिफ शेख हे जुमेराह परिसरात एका कंपनी मालकाकडे चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनीही आपल्या भागात कोणतेही मोठे नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट केले. काही ड्रोन किंवा मिसाईलचे तुकडे पडल्याच्या घटना घडल्या; मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे. शाळा तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. कंपनी व शासकीय कार्यालये नियमित सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

अटलांटिस हॉटेलपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अमेरिकन बेस कॅम्पवर एक मिसाईल डागण्यात आले होते. त्या ठिकाणी मोठा खड्डा पडल्याची माहिती स्थानिकांनी दिली; मात्र सुरक्षा यंत्रणांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणल्याचेही मुबारक शेख यांच्या मुलाकडून सांगण्यात आले. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओंमुळे भीतीचे वातावरण निर्माण होत असले, तरी प्रत्यक्ष परिस्थिती नियंत्रणात असून नागरिक सुरक्षित आहेत, असा दिलासा परदेशात वास्तव्यास असलेल्या अनफ वस्तीतील बांधवांनी आपल्या कुटुंबीयांना दिला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दुबईत डोमेस्टिक विमानसेवा सुरळीत सुरू असली, तरी आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद असल्याने गावाकडे परतण्याच्या तयारीत असलेल्या अनेकांच्या स्वप्नांना अचानक ब—ेक लागला आहे. हातात तिकीट, मनात घराची ओढ आणि डोळ्यांत कुटुंबीयांची आस असताना प्रवास अनिश्चित झाल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली आहे. सौदी रियाद येथील विमानतळावर नोकरीस असलेले नितवडे येथील सुनील पाटील यांनी सध्याच्या विमानसेवेबाबत सांगितले की, भारतासाठी मुंबई, दिल्ली आणि कोचीन या शहरांकडे मंगळवारपासून विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच पाकिस्तान आणि लंडन या मार्गावरील विमान सेवा यापूर्वीही बंद नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. दुबई, कतार सेवा बंद असल्याचे त्यांनी सांगितले.

यूएई सरकार सक्षम

मडिलगे बुद्रूक येथील जीवनकला देसाई यांनी यूएईतील सध्याच्या परिस्थितीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, यूएई सरकार परिस्थिती अत्यंत सक्षमपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने हाताळत आहे. जोखीम व्यवस्थापनामध्ये ते खरोखरच उत्कृष्ट आहेत. जनतेमध्ये कोणतीही भीती पसरू न देता शांतता राखणे आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू ठेवणे, हे त्यांनी प्रभावीपणे सांभाळले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news