

पन्हाळा : शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असलेल्या ‘वर्ग-२’च्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठी पन्हाळा उपविभागीय अधिकाऱ्यांचा बनावट भोगवटा बदल आदेश, खोटे शिक्के आणि बनावट सह्या तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाहुवाडी तालुक्यातील अनुस्कुरा येथील गट क्रमांक १८६ मधील ३.६६ हेक्टर जमिनीच्या व्यवहारात हा गैरप्रकार घडला असून, याप्रकरणी करंजफेणचे प्रभारी मंडळ अधिकारी बाळू यमाजी कोथेरे यांच्या फिर्यादीवरून शाहुवाडी पोलिस ठाण्यात आठजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय पाटील (रा. टेकोली), युवराज कांबळे (रा. मलकापूर), शाहू धोंडी कांबळे, शिवाजी ऊर्फ शिवराम धोंडी कांबळे (दोघे रा. अनुस्कुरा, ता. शाहूवाडी), परशुराम दादू लोखंडे (रा. नवे पारगाव, ता. हातकणंगले), तसेच सतीश बंडू सुतार, अमित शामराव पाटील आणि सर्जेराव महिपती सुतार (सर्व रा. सांबू, ता. शाहूवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अनुस्कुरा येथील गट क्र. १८६ मधील एकूण १४.६५ हेक्टर आर जमीन ‘वर्ग-२’ची असल्याने खरेदी-विक्रीपूर्वी जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे. खातेदार शाहू व शिवाजी कांबळे यांच्यातर्फे वटमुखत्यार परशुराम लोखंडे यांनी ३.६६ हेक्टर जमीन परशुराम लोखंडे, सतीश सुतार, अमित पाटील व सर्जेराव सुतार यांना ७ जुलै २०२३ च्या खरेदी दस्ताने विकली. त्यासाठी पन्हाळा उपविभागीय अधिकाऱ्यांचा ३१ मार्च २०२३ चा भोगवटा बदल आदेश जोडण्यात आला व ४ ऑगस्ट २०२३ रोजी अंतिम नोंद झाली.
सुनील सखाराम कुंभार (रा. पडळ, ता. पन्हाळा) यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी या आदेशाची नक्कल मागितल्यानंतर पडताळणीत तो आदेश बनावट असल्याचे समोर आले. चौकशीत खरेदी देणार व घेणार यांनी २० नोव्हेंबर २०२६ रोजी लेखी जबाबात हे काम अक्षय पाटील व युवराज कांबळे यांनी केल्याचे आणि त्यासाठी ३ लाख रुपये दिल्याचे नमूद केले. त्यानंतर पन्हाळा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या २० नोव्हेंबर २०२६ च्या आदेशानुसार मंडळ अधिकारी कोथेरे यांनी फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल हणमंत पांडुरंग कुंभार करत आहेत.