Fake Medicine Sale
Fake Medicine SalePudhari

Fake Medicine : भारतीय औषध बाजारात बनावट औषधांचा सुळसुळाट

पुणे एफडीएने केला जीवरक्षक बनावट ‌‘अल्बुरेल‌’ औषधाचा पर्दाफाश; माफियांचे जाळे सक्रिय, अनेक जण रडारवर
Published on

राजेंद्र जोशी

कोल्हापूर ःजगाची फार्मसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतामध्ये सध्या बनावट औषधांचा सुळसुळाट वाढला आहे. या बनावट औषधांमध्ये आता माफियांनी रुग्णाला जीव वाचविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अत्यावश्यक औषधांची हुबेहूब नक्कल बाजारात आणल्यामुळे थेट रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू झाला आहे. अशा विक्रेत्यांचे औषध विक्री परवाना रद्द करण्याचे मोठे पाऊल अन्न व औषध प्रशासनाने उचलले आहे. तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. पुणे एफडीएने जीवरक्षक बनावट ‌‘अल्बुरेल‌’ औषधाचा पर्दाफाश केला आहे. एफडीएच्या रडारवर अनेक जण आहेत.

राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने गेल्या काही महिन्यांत बनावट औषधांच्या शोधमोहिमेत मोठी कामगिरी बजावली आहे. 28 जुलै 2025 रोजी या विभागाच्या एका पथकाने पुण्यात सदाशिव पेठेतील मैत्री फार्मास्युटिकल्स या होलसेल औषध आस्थापनेची तपासणी केली होती. यामध्ये ‌‘रिटक्सरेल‌’ व ‌‘अल्बुरेल‌’सह काही औषधांचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल 2 फेब्रुवारी 2026 रोजी सादर झाला. यामध्ये ‌‘अल्बुरेल‌’ नावाचे औषध बनावट असल्याचे घोषित करण्यात आले. हे औषध रिलायन्स हेल्थ सायन्सेस या कंपनीचे उत्पादन आहे. संबंधित कंपनीने तपासणी केलेल्या उत्पादनाच्या बॅचशी आपल्या कंपनीची बॅच जुळत नाही, असे स्पष्ट केल्यानंतर या बनावट औषधाच्या रॅकेटचा शोध सुरू झाला.

बनावट औषधांच्या रॅकेटमध्ये साई लॉजिस्टिक नागपूर, नेक्सस लाईफ केअर प्रा. लि. मुंबई, एनआरएक्स डिस्ट्रीब्युटर्स एलएलपी मुंबई आणि आरआरटी फार्मा कामोठे-रायगड ही वितरकांची साखळी दृष्टीपथात आली. यापैकी महाराष्ट्रात या बनावट औषधाचा जेथून उगम झाला, त्या आरआरटी फार्मा या औषध वितरकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याचे मूळ बिहारकडे असल्याचे बोट दाखविले जाते.

वैद्यकीय उपचारात रुग्णाच्या रक्तातील प्रथिनांचे प्रमाण कमी झाले, की प्रतिकारशक्ती कमी होते. अशा वेळी त्याला ‌‘अल्बुमिन‌’ नावाचे प्रोटिन रक्तावाटे दिले जाते. मानवी रक्तातील प्लाझमापासून बनविण्यात आलेले हे औषध जीवरक्षक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या औषधाची सुमारे 3 हजार कोटी रुपयांची बाजारपेठ आहे. या औषधासह राज्यातील अन्न व औषध प्रशासनाला प्रभावी जैव उत्प्रेरक (एल्झाईम) म्हणून ओळखले जाणारे टोरंट फार्मास्युटिकल्स या कंपनीच्या उत्पादनाची बनावट कॉपी आढळून आली. (पूर्वार्ध)

एक हजार कोटींची बाजारपेठ

ठाण्यातील अन्न व औषध प्रशासनाने ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीचे उच्च रक्तदाबावर वापरले जाणारे ‌‘टेल्मा‌’ या उत्पादनाची बनावट आवृत्ती शोधून काढण्यात यश मिळविले. अल्बुमिन व टेल्मा या दोन्ही औषधांची वार्षिक बाजारपेठ 1 हजार कोटीपेक्षा अधिक आहे. या प्रकरणात गुंतलेल्या औषध विक्रेत्यांवर कारवाई सुरू आहे. त्यांचे परवाने रद्द होतील. फौजदारी खटले सुरू होतील. मात्र, नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बनावट औषधांचा सुळसुळाट रोखणार कसा, हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news