

कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या विभागीय भरारी पथकाने वाशी आणि हळदी येथे छापा टाकून 15 लाखांची गोवा बनावटीची दारू आणि दोन वाहने असा 26 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील चौघांना अटक केली. हळदी येथे पाठलाग करून ही कारवाई केली.
7 जून रोजी एका कारमधून गोवा बनावटीची दारू कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे वाशी येथे सापळा रचून कार पकडली. या कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचे बॉक्स होते. कार व दारू असा 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ऋषीकेश बिभीषण गायकवाड (वय 26, रा. वखारी, सोलापूर) यास अटक केली.
याच पथकाने 8 जून रोजी हळदी गावानजीक सापळा रचून एक मोटार पकडून 35 बॉक्स गोवा बनावटीची दारू जप्त केली. राज्य शासनाचा कर चुकविण्यासाठी चोरट्या मार्गाने ही दारू कोल्हापुरात आणल्याचे स्पष्ट झाले. भरारी पथकाने पाठलाग करून ही मोटार जप्त केली. या प्रकरणी स्वप्निल ऊर्फ मुन्ना भीमराव वसेकर (वय 26), संकेत संतोष सोनटक्के (21, दोघे रा. टाकळी सिकंदर, सोलापूर), सूरज संजय लोंढे (24, रा. देगाव, जि. सोलापूर) या तिघांना अटक केली. या दोन्ही कारवाईत 15 लाखांची गोवा बनावटीची दारू व 11 लाखांची दोन वाहने असा 26 लाख 30 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडहिंग्लज कार्यालयातर्फे तिलारी (ता. चंदगड) येथे गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. दारू आणि वाहनांसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत राजू सुनील चौधरी (रा. तानाजी गल्ली, बेळगाव), अनिल शिवानंद काकनूर (रा. सय्यद कंपाऊंड, बेळगाव) या दोघांना अटक केली आहे.