

कोल्हापूर : मूल होत नसेल तर तिला प्रचंड टोमणे सहन करावे लागतात. माहेरहून पैसे, वस्तू आणण्यासाठी होणार्या छळामुळे तिची मानसिकता बिघडते. आर्थिक घडी विस्कटली की तिला काळजीने ग्रासते. नवर्याचे व्यसन, व्यभिचार यामुळे ती अस्वस्थ होते. महिलांच्या अगतिकतेची ही दुखरी नस ओळखून भोंदूबाबांकडून गैरफायदा घेण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढले आहे.
मूल होत नसलेल्या महिलांच्या मानसिक अवस्थेला भोंदूबाबा लक्ष्य बनवतात. मूल होत नसेल तर खोटे मंत्र पुकारून नारळात अंगारा घालून दिला जातो, तर गर्भधारणा राहिल्यानंतर मुलगाच होईल, असे सांगून वडाच्या चिकासह कळ्या मंतरून भंडारा घालून खाण्यासाठी दिल्या जातात. हे उपाय सांगण्यासाठी अवाजवी पैसे दक्षिणा म्हणून घेतले जातात. भोंदूबाबा दिवसभर महिलांना ताटकळत थांबवून ठेवतात. प्रसंगी त्यांना गुंगीचे औषध देउन शारीरिक जवळीक केली जाते. केवळ सामाजिक व कौटुंबिक दबावापोटी अनेक ग्रामीण भागातील महिला भोंदूबाबांच्या या उपायांना बळी पडत असल्याचे चित्र आहे.
महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी भोंदूबाबा गावात पत्रकबाजी, सोशल मीडियावरील पोस्ट याद्वारे आकर्षक जाहिराती करतात. अघोरी उपायांसाठी महिलांना सहजपणे बाजारात उपलब्ध होणार नाही असे साहित्य आणायला सांगितले जाते. अनेकदा महिला घरी कुणालाही न सांगता हे उपाय करत असतात. याचा फायदा घेत भोंदूबाबा उपायांसाठी लागणार्या साहित्याचे भरमसाठ पैसे घेऊन महिलांना आर्थिक दरीत ढकलतात.