

कोल्हापूर : कोल्हापुरातील न्यू मेवाड आईस्क्रीम व जयसिंगपूर येथील बनावट तूप उत्पादन केंद्रावर छापे टाकून अन्न व औषध विभागाच्या पथकाने सुमारे 2 लाख 5 हजार रुपयांचा साठा जप्त केला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे.
शुक्रवारी जयसिंगपुरात राहुल भाऊसो मगदूम यांच्या घरी अन्नसुरक्षा अधिकार्यांच्या पथकाने तपासणी केली. यात बनावट व बेकायदेशीर तुपाचे उत्पादन, साठा आणि विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले. अन्नसुरक्षा अधिकारी पी. के. घुगे यांनी कारवाई करत म्हैस व गाय तुपाचे चार नमुने तपासणीसाठी ताब्यात घेत 595 लिटरचा उर्वरित तुपाचा 1.78 लाखांचा साठा जप्त करण्यात आला. कोल्हापुरातील शालिनी पॅलेस जवळील न्यू मेवाड आईस्क्रीमवरही कारवाई करण्यात आली.