Panhala Fake Doctor: पन्हाळ्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या दोघांना अटक

खोतवाडीतील ‘श्री समर्थ क्लिनिक’वर छापा; एलसीबी व आरोग्य विभागाची संयुक्त कारवाई
Panhala Fake Doctor
Panhala Fake Doctor: पन्हाळ्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या दोघांना अटकPudhari
Published on
Updated on

पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी येथे बोगस डॉक्टर म्हणून दवाखाना चालवत गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि आरोग्य विभागाने संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला. या प्रकरणी ऋषीकेश रामचंद्र खोत (वय २८, रा. खोतवाडी) आणि त्याला औषधे पुरवणारा एजंट ऋषीकेश संजय माने (वय २७, रा. अंबाईनगर, हुपरी) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अवैध वैद्यकीय व्यवसाय आणि स्त्री भ्रूणहत्येला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. ऋषीकेश खोत हा कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना ‘श्री समर्थ क्लिनिक’च्या नावाखाली बेकायदेशीरपणे प्रॅक्टिस करत असल्याची माहिती होती. याची खात्री करण्यासाठी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला बनावट रुग्ण म्हणून क्लिनिकमध्ये पाठवण्यात आले.

सदर महिलेनं गर्भपाताच्या औषधांची चौकशी केली असता, खोत याने ३ हजार रुपयांत औषधे देण्याचे मान्य केले. त्यानंतर त्याने हुपरी येथील ऋषीकेश माने याला फोन करून औषधांसह बोलावले. माने क्लिनिकमध्ये पोहोचताच आणि औषधे देण्याचा व्यवहार सुरू असतानाच, दबा धरून बसलेल्या पथकाने छापा टाकून दोघांना रंगेहात पकडले.

तपासणीदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खोत याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याचे स्पष्ट केले. तो बेकायदेशीररीत्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे उघड झाल्यानंतर आरोग्य अधिकारी डॉ. सुनील अभिवंत यांनी क्लिनिकमधील औषधे व साहित्य जप्त केले. याप्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालींदर जाधव, पोलीस अंमलदार संजय पडवळ, अमित सर्जे, महेश आंबी, गजानन गुरव, सुशील पाटील, सचिन जाधव, वंदना पसारे, सीताराम डोईफोडे तसेच आरोग्य विभागाचे डॉ. सुनील अभिवंत, डॉ. शैलेंद्र गायकवाड, ॲड. गौरी पाटील आणि गीता हासुरकर यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news