

कोल्हापूर : सोयीच्या बदलीसाठी किंवा बदली टाळण्यासाठी शिक्षकांनी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र खोटे आढळून आल्याने जिल्हा परिषदेतील तेरा शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने सादर केलेल्या अहवालावरून मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी ही कारवाई केली. त्यामुळे शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे.
यामध्ये मारुती कोंडिबा पोवार, शबाना अब्दुलगणी मुजावर (कागल), कृष्णा दयानंद सुतार, अमर दादासो मगदूम, विनोद प्रल्हाद कांबळे (करवीर), उत्तम नेताजी फराकटे व विद्या विलास खाडे, शाहू गणपती चव्हाण (राधानगरी), स्वाती अनिल पाटील (हातकणंगले), बिरदेव साताप्पा पडवळे (भुदरगड), भालचंद्र रामचंद्र खोत, फारुक सिकंदर फकीर, रूपाली राजकुमार वाघमोडे (शिरोळ) यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकरण गाजत आहे. त्यामुळे या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. जिल्हा परिषदेतील दिव्यांग कर्मचारी, शिक्षकांना बदलीमध्ये सवलत असते. गेल्यावर्षी करण्यात आलेल्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये साधारणपणे 350 शिक्षकांनी दिव्यांगाची प्रमाणपत्रे सादर केली होती; परंतु काही शिक्षकांनी खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याच्या तक्रारी राज्यभरातून शासनाकडे आल्या होत्या. त्याची दखल घेऊन शिक्षण विभागाने याची चौकशी करण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिले होते. त्यानुसार त्याची चौकशी करण्यात आली होती.
चौकशी होऊन साधारणपणे दोन ते तीन महिने झाले; परंतु अद्याप कोणावरही कारवाई करण्यात झाली नव्हती. त्यामुळे याकडे लक्ष लागून राहिले होते. 13 शिक्षकांचे दिव्यांग प्रमाणपत्र अवैध, संशयास्पद व नियमबाह्य असल्याचे आढळून आल्याने जिल्हा परिषदेने 13 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली. यापूर्वी चार शिक्षकांना निलंबित करण्यात आल्याने निलंबित केलेल्या शिक्षकांची संख्या 17 वर गेली आहे. या प्रमाणपत्रांच्या आधारे काही शिक्षकांनी आपली बदली सोयीच्या ठिकाणी करून घेतली, तर काहींनी बदली प्रक्रियेपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे.
निलंबित शिक्षकांकडून वेगवेगळी कारणे
निलंबित केलेल्या शिक्षकांपैकी सात शिक्षकांनी स्वत: दिव्यांग असल्याचे, 4 शिक्षकांनी मुलगा दिव्यांग असल्याचे, एका शिक्षकाने जोडीदार दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. एका शिक्षकाने जोडीदाराची हृदय शस्त्रक्रिया झाल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. निलंबित शिक्षकांची विभागीय चौकशी सुरू करण्यात येणार असून त्याच्यावर बडतर्फीची आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.