

प्रवीण आजगेकर
गडहिंग्लज : गडहिंग्लजमध्ये एका ट्रकमालकाच्या टोल भरण्याच्या अडचणीतून सुरू झालेली एक साधी वाटणारी घटना अखेर देशव्यापी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करणारी ठरली. आकाश रिंगणे या युवकाने 17 जून रोजी गडहिंग्लजमधील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये 500 रुपयांच्या 35 बनावट नोटा भरल्या. एकाचवेळी इतक्या नोटा बँकेच्या यंत्रणेत सापडताच पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि सुरू झाला एक तपास...
गडहिंग्लज पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल ते थेट बांगला देश सीमेपर्यंत धडक कारवाई केली. तपासात रिंगणेपासून सुरू झालेला धागा नितीन कुंभार, अशोक कुंभार, दिलीप पाटील, सतीश कणकणवाडी, भरमू कुंभार, अक्षय कुंभारपर्यंत पोहोचला. यातील मुख्य सूत्रधार अशोक कुंभारने बंगळुरुतील तुरुंगात मलिक शेख या बनावट नोटांच्या तस्करांशी संबंध वाढवले आणि तिथून सुरू झाला हा बनावट नोटांचा काळा धंदा.
पोलिसांनी केलेल्या तपासानुसार या बनावट नोटा बांगला देशात छापल्या जात होत्या. नंतर त्या मालदा येथून भारतात सीमारेषेवरून पार्सल स्वरूपात फेकल्या जात. टोनी व मलिक यांनी या नोटा ताब्यात घेऊन त्या हस्तकांमार्फत कर्नाटकातील बंगळूर आणि इतर शहरांमध्ये पोहोचवल्या. हा सारा व्यवहार अत्यंत गोपनीयतेने आणि ऑनलाईन बँक खात्यांमार्फत केला जात होता.
या धक्कादायक कारवाईमुळे बनावट नोटांच्या राष्ट्रीय जाळ्याचा पर्दाफाश झाला असला तरी, ही या प्रकरणाची केवळ सुरुवात आहे. सीमापार संबंध, तुरुंगातले कनेक्शन, ऑनलाईन व्यवहाराचे जाळे, या सर्व बाबींनी पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. देशात अजून किती रिंगणे असतील, जे ‘टोल’च्या नावाखाली असा ‘झोल’ करत असतील? हा झोल उघड झाला नसता, तर चलनातच चलन फसवेगिरीचे सत्र सुरूच राहिले असते.
या बनावट नोटा चलनात आणणार्या हस्तकांना एक लाखाच्या बनावट नोटांमागे 40 हजार रुपये मिळायचे. त्यातूनच सारा पैसा ऑनलाईन खात्यांमध्ये फिरत होता. पोलिसांच्या चौकशीत आतापर्यंत 35 लाख रुपयांच्या बनावट नोटा हे जाळं वापरून चलनात आणल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ रिंगणे हा एटीएममध्ये नोटा भरताना सापडला नसता, तर हे रॅकेट किती मोठ्या प्रमाणावर पसरले असते, हे सांगता येत नाही.