

इचलकरंजी : तब्बल २२ कोटींच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या मंजुरीवरून भाजपमधील आवाडे-हाळवणकर वाद विकोपाला गेल्याचे बुधवारी चव्हाट्यावर आले. हाळवणकर गटाच्या नगरसेवकांनी विरोधी शिवशाहू आघाडीशी केलेल्या सोबतीमुळे या आराखड्याला मंजुरी मिळाली नाही.
बुधवारी स्थायी समितीची बैठक सभापती सतीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये २२ कोटी रुपयांचा घनकचरा प्रकल्प आराखडा मांडण्यात आला. महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना एवढा मोठा प्रकल्प मांडणे योग्य नाही, असे मत मांडत हाळवणकर गटाचे तानाजी पोवार यांनी आक्रमकपणे या विषयाला विरोध केला. शिवशाहू आघाडीच्या नगरसेवकांनीही हे मत उचलून धरले. सभागृहात शेवटी सभापती मुळीक यांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रस्तावाच्या बाजूने केवळ ६ मते पडली, तर विरोधात ९ सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे २२ कोटी रुपयांचा प्रकल्प नामंजूर झाला.