Heavy Rainfall | राधानगरीसह १७ धरण क्षेत्रांत अतिमुसळधार

गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यात अतिवृष्टी; शहरात ११ ठिकाणी झाडे कोसळली
कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने केर्ली मार्गावरील नदी कडेच्या शेतांमध्ये पाणी आले आहे.
कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने केर्ली मार्गावरील नदी कडेच्या शेतांमध्ये पाणी आले आहे. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात पावसाच्या धुवाँधार कोसळधारा सुरू आहेत. गेल्या २४ तासांत गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगडसह जिल्ह्यात २७ ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी, तुळशी, कुंभी, कोदे धरण क्षेत्रांत २०० मि.मी. हून अधिक पाऊस झाला. परिणामी, सात मार्गांवरील एसटी सेवा विस्कळीत झाली आहे. तर तीन मार्ग बंद झाले असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. दिवसभरात शहरात ११ ठिकाणी झाडे कोसळली.

गेल्या २४ तासांत शहरात ४४ मि.मी., तर १२ तालुक्यांत सरासरी ५२.८ मि.मी. पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वाधिक १४३.१ मि.मी. पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये अतिमुसळधार वृष्टीमुळे नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी शनिवारी रात्री २६ फूट २ इंचांवर होती. यामध्ये दिवसभरात ५ फूट ७ इंचांनी वाढ झाली. रात्री १२ वाजता पातळी ३१ फूट ९ इंचांवर पोहोचली होती. दुपारी पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आले आहे. वेदगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी ओलांडली आहे.

येथे झाली अतिवृष्टी

जिल्ह्यात गगनबावडा, साळवण, पडळ, बाजारभोगाव, कोतोली, करंजफेन, राधानगरी, सरवडे, कसबा वाळवे, आवळी, सांगरुळ, कापशी, खडकवाडा, मुरगूड, बिद्री, गारगोटी, पिंपळगाव, कूर, आजरा, गवसे, मलिग्रे, उत्तूर, माणगाव, कोवाड, तुर्केवाडी, चंदगड या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.

इशारा पातळीपासून पंचगंगा ७ फूट दूर

पंचगंगा नदीची इशारा पातळी ही ३९ फूट आहे. तर धोका पातळी ४३ फूट आहे. सध्या पंचगंगा नदीचे पाणी इशारा पातळीपासून ७ फूट दूर आहे.

जिल्ह्यात ७ घरांची पडझड; ४ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये घरांची व जनावरांच्या गोठ्यांची पडझड झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अहवालानुसार रविवारी ७ घरांची अंशतः पडझड झाली. तर एका जनावराच्या गोठ्याची पडझड झाली. जिल्ह्यात ९ खासगी मालमत्तेचे ४ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.

शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ. यवलूज, बा. भोगाव, पुनाळ-तिरपण, वालोली, ठाणे-आळवे, कोडोली, मांगले-सावर्डे, कोपार्डे, सवते-सावर्डे, सरूड-पाटणे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे राशिवडे, शेणवडे, कळे, सांगरूळ, बस्तवडे, चिखली, कुरणी, निळपण, वाघापूर, सुरूपली, गारगोटी, महसवे, सिद्धनेर्ली, दत्तवाड, कानडी सावर्डे, कांटे, कळे.

राधानगरी धरण ४२ टक्के भरले

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत धरण ४१ टक्के भरले आहे. रविवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात २३८ मि.मी. पाऊस झाला, तर दिवसभरात ११८ मि.मी. पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर एकूण ९७९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली आहे. दुसरीकडे बळीराजा भात चिखलणीच्या कामात व्यस्त झाला आहे. भोगावती नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे.

शिंगणापूर बंधाऱ्यास जिल्हाधिकाऱ्यांची भेट

बालिंगा : पावसामुळे शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेल्याने शिंगणापूर मार्गे चिखली, पन्हाळा, जोतिबासाठी जाणारा मार्ग बंद झाला आहे. या बंधाऱ्यास जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भेट दिली. यावेळी महसूल प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन यांना शिंगणापूर बंधाऱ्यापासून संभाव्य धोका टाळण्यासाठी योग्य त्या उपाय योजना कराव्यात. बंधाऱ्यावरून कोणी जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कारवाई करा तसेच स्थलांतरीत कुटुंबांचे नियोजन याबाबत आढावा घेतला. यावेळी करवीरचे तहसीलदार स्वप्निल पवार, प्रांताधिकारी मौसमी चौगले, सुहास साळोखे, ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव, यशवंत बँक अध्यक्ष महेश पाटील, माजी जि. प. सदस्य बाळासो कांबळे, सुरेश चौगले, पोलिसपाटील, ग्रामपंचायत अधिकारी बाळासो कांबळे, महसूल सेवक साताप्पा पाटील, महसूल सहायक प्रकाश शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news