Flood Alert | आठ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी; पंचगंगा ३२.११ फुटांवर

शहरात दिवसभर उघडीप
कोल्हापूर : पंचगंगेच्या पुराचे पाणी नदीघाट परिसरात पुढे सरकू लागले आहे.
कोल्हापूर : पंचगंगेच्या पुराचे पाणी नदीघाट परिसरात पुढे सरकू लागले आहे.
Published on
Updated on

कोल्हापूर : शहरात पवासाने रविवारी दिवसभर काहीशी विश्रांती घेतली होती; मात्र धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे. गेल्या २४ तासांत राधानगरीसह आठ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. दरम्यान, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात अर्धा फुटांची वाढ होऊन पातळी रात्री ८ वाजता ३३ फुटांवर पोहोचली होती. रात्री ९ नंतर पातळी एक इंचाने घटून ३२.११ फुटांवर पोहोचली.

जिल्ह्यात पावसाने पुन्हा ब्रेक घेतला आहे. शनिवारी सायंकाळनंतर सुरू झालेली रिपरिप रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र, रविवारी सकाळपासूनच पावसाने पूर्ण विश्रांती घेतील. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७.५ मि.मी. पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक २०.३ मि.मी. पाऊस गगनबावडा व २०.२ मि.मी. पाऊस राधानगरी तालुक्यात झाला. धरण क्षेत्रांत पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी, तुळशी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जांबरे, सर्फनाला, कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली.

पंचगंगेची पातळी अर्धा फुटाने वाढली

पंचगंगा नदीची पातळी शनिवारी रात्री १२ वाजता ३२ फूट ६ इंचांवर होती. रविवारी दिवसभरात यामध्ये अर्धा फुटांची वाढ झाली. रात्री नऊनंतर यात घट झाली. १० वाजता पातळी ३२.११ फुटांवर पोहोचली होती.

३३ बंधारे पाण्याखाली

जिल्ह्यातील ३३ बंधारे पाण्याखाली असून त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. याशिवाय चार इतर जिल्हा मार्ग, १२ ग्रामीण मार्ग, दोन राज्य मार्ग पाण्याखाली आहेत. पावसामुळे तीन पक्क्या, तर सहा कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली. एका गोठ्याचीही पडझड झाली. जिल्ह्यातील १० खासगी मालमत्तांचे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले.

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले

राधानगरी : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळे शनिवारी बंद झालेला स्वयंचलित दरवाजा रविवारी खुला झाला असून दोन दरवाजे खुले आहेत. दोन दरवाजातून २८५६ व खासगी वीजगृहातून १४०० असा एकूण ४२५६ क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. रविवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत १२६ मिमी. पाऊस झाला, तर दिवसभरात ४८ मिमी. पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर एकूण ३१४० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पाणीपातळी ३४७.२३ फूट असून ८३०९.८८ द.ल.घ.फू. इतका पाणीसाठा आहे. दरम्यान, भोगावती नदीपात्रात होत असलेल्या विसर्गामुळे पातळीत मोठी वाढ झाली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news