Gokul Election : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी मागितली नोव्‍हेंबरपर्यंत मुदतवाढ

विभागीय उपनिबंधकांकडून सर्वोच्‍च न्‍यायालयात आज अर्ज शक्‍य
Gokul election |
Gokul election |
Published on
Updated on

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ, गोकुळच्‍या निवडणूक प्रक्रियेसाठी विभागीय उपनिबंधक तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी देवीदास मिसाळ यांनी १२० दिवसांची आणखी मुदत मिळण्‍याची मागणी केली आहे. यासंदर्भातील अर्ज ते शुक्रवारी (दि. ३१) सर्वोच्‍च न्‍यायालयात करण्‍याची शक्‍यता आहे. मिसाळ यांनी मागणी केल्‍याप्रमाणे न्‍यायालय गोकुळ निवडणुकीला नोव्‍हेंबरपर्यंत मुदतवाढ देणार का? याकडे सहकार विभागासह राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

पुंगाव (ता. राधानगरी) येथील स्‍वामी समर्थ दूध संस्‍थेच्‍या प्रशासक मंडळाची नियुक्‍ती रद्द करून संचालक मंडळाला मुदतवाढ द्यावी, या याचिकेवर सर्वोच्‍च न्‍यायालयात झालेल्‍या सुनावणीदरम्‍यान न्‍यायालयाने ‘गोकुळ’ची निवडणूक ९० दिवसांत पूर्ण करण्‍याचे आदेश दिले होते. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार निवडणूक प्रक्रियेची मुदत ३ ऑगस्‍टला संपत आहे. तरीही निवडणूक प्रक्रिया संथगतीने सुरू असल्‍याने स्‍वामी समर्थ दूध संस्‍थेने पुन्‍हा कोल्‍हापूर सर्किट बेंचमध्‍ये याचिका दाखल केली. याचिकेवर बुधवारी (दि. २९) सुनावणी झाली. न्‍यायालयाने निवडणूक प्रक्रिया तत्‍काळ सुरू करावी. दिरंगाई झाल्‍यास सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाचा अवमान केल्‍याबाबत कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्‍याचा इशारा दिला. कोल्‍हापूर सर्किट बेंचच्‍या इशार्‍यानंतर राज्‍य सहकार निवडणूक प्राधिकरणसह विभागीय उपनिबंधक हालले आहेत. विभागीय निबंधक मिसाळ यांनी तत्‍काळ सर्वोच्‍च न्‍यायालयात १२० दिवसांची मुदतवाढ मागण्‍याची तयारी केली आहे. यावर सर्वोच्‍च न्‍यायालय काय आदेश देणार याकडे नजरा असणार आहेत.

मागणीनुसार नोव्‍हेंबरमध्‍ये मतदान

‘गोकुळ’ची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्‍यानंतर २५ दिवसांचा कालावधी यादीवर हरकती व सुनावणीसाठी लागणार आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्‍यानंतर पुढील निवडणूक कार्यक्रमासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागेल. त्‍यानुसार ऑक्‍टोबरमध्‍ये मतदान होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, विभागीय उपनिबंधकांनी १२० दिवसांची मुदतवाढ मागितली असून, त्‍यास न्‍यायालयाने मंजुरी दिल्‍यास ‘गोकुळ’साठी नोव्‍हेंबर २०२६ मध्‍ये मतदान होण्‍याची शक्‍यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news