कोल्हापूर : गेल्या तीन दशकांत युद्धांचे सावट, नैसर्गिक आपत्ती आणि जागतिक मंदी येऊनही शेअर बाजाराचा निर्देशांक ८ हजारांवरून ७६ हजारांवर पोहोचला. भारतीय बाजारपेठेत यापुढेही वाढ कायम राहणार असल्याने चढ-उताराची भीती न बाळगता गुंतवणुकीत सातत्य ठेवावे. तरुण पिढीने लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करून दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवावे, असे प्रतिपादन तज्ज्ञांनी केले.
दैनिक ‘पुढारी’ आणि 'आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड' यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल अयोध्या येथे 'म्युच्युअल फंड आणि आर्थिक साक्षरता' या विषयावर मार्गदर्शन चर्चासत्र पार पडले. यावेळी झोनल ट्रेनिंग मॅनेजर अभिजित देशमाने म्हणाले, भारत २०४७ पर्यंत २० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करत आहे. या प्रवासात बाजार स्थिर राहणार नसला, तरी शिस्त आणि सातत्यच गुंतवणूकदाराला समृद्ध करेल.
अनिल वैद्य यांनी बाजारातील घसरणीच्या वेळी न घाबरता गुंतवणूक वाढवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, बाजार जोखीम कमी करण्यासाठी 'एसआयपी' (SIP) योजना अत्यंत प्रभावी आहे. एकाच घटकात पैसे अडकवण्यापेक्षा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड ठेवावा. संतोष मालगावे यांनी, महागाईवर मात करण्यासाठी प्रत्येकाकडे भाडे किंवा परताव्याच्या स्वरूपात पॅसिव्ह इन्कमचा स्रोत असणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी सीए अमोल पवार, दै. 'पुढारी'चे सिनिअर इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ओंकार कुलकर्णी यांनी केले. चर्चासत्राला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.