

सुनील कदम
कोल्हापूर : बांगला देशातील हिंदू समुदायावर होत असलेल्या अत्याचारांमुळे देशभरात आणि प्रामुख्याने हिंदू समुदायात संतापाची लाट उठलेली दिसत आहे. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने कठोर उपाययोजना करून इथल्या घुसखोर बांगला देशी लोकांना शोधून तिकडे हाकलून द्यावे आणि तिथल्या हिंदू लोकांना भारतात परत आणावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
भारतात गेल्या काही वर्षांत घुसखोरी केलेल्या बांगला देशी घुसखोरांची नेमकी संख्या शासकीय यंत्रणांकडे उपलब्ध नसली, तरी हा आकडा किमान 5 ते 6 कोटी असावा, असा जाणकारांचा अंदाज आहे. कारण, पश्चिम बंगाल आणि आसामसह पूर्वोत्तर राज्यांमध्येच त्यांची संख्या 2 ते 3 कोटींच्या घरात आहे. मात्र, देशभरातील बांगला देशी घुसखोरांचा विचार करता हा आकडा किमान 5 ते 6 कोटी निश्चितच असावा. अशांचा शोध घेऊन त्यांना बांगला देशात हाकलण्याची एक व्यापक मोहीम केंद्र आणि राज्य शासनाने सुरू करण्याची गरज आहे.
मागील एक-दोन वर्षात पुणे, मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड आदी भागांत ज्या बांगला देशी घुसखोरांना पकडण्यात आले आहे, त्या बहुतेकांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आढळून आलेले आहे. त्याचा वापर करून हे लोक शासकीय योजनेतील मोफत धान्य योजनेचा लाभही घेताना आढळून आले आहेत. ग्रामीण भागातही असे घुसखोर आढळून येऊ लागले आहेत. त्यांच्याकडेही रेशन कार्डे मिळू लागली आहेत. याचा अर्थ शासकीय-प्रशासकीय यंत्रणेतील अंदाधुंदीमुळे राज्याच्या अस्तनीत दिवसेंदिवस घुसखोरीचे निखारे फुलू लागले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पावले उचलून विशेष घुसखोर शोध मोहीमसुद्धा राबवायला हरकत नाही.
पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर राज्यांमध्ये बांगला देशी घुसखोरांनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केल्यामुळे सीमावर्ती भागातील शेकडो हिंदूबहुल गावे आता मुस्लिमबहुल झाली आहेत. देशाच्या विविध भागांत घुसखोरी केलेले बहुतांश बांगला देशी हे अनैतिक व्यवसायांमध्ये गुंतल्याचे दिसतात. वेश्या व्यवसायात तर बांगला देशी युवतींचीच चलती आहे. शिवाय, देशामध्ये चालणार्या अमली पदार्थांच्या व्यवसायात बांगला देशी घुसखोरांचा वाटा फार मोठा आहे. त्यामुळे कठोरातील कठोर ऑपरेशन करून बांगला देशी घुसखोरीची कीड मुळापासून उपटण्याची आवश्यकता आहे.
हे जे बांगला देशी घुसखोर आहेत आणि त्यांच्याकडे जी बनावट ओळखपत्रे आहेत, ती इथल्याच शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणेने उपलब्ध करून दिलेली दिसतात. महानगरातील काही नगरसेवकांनीही मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी या घुसखोरांची नावे मतदारयाद्यांमध्ये घुसडलेली दिसतात. या सगळ्याचा शोध घेऊन बांगला देशी घुसखोरांना हाकलण्याची गरज आहे.
पश्चिम बंगालमधील माल्डा हे शहर या भागातील अवैध धंद्यांची राजधानी म्हणून ओळखले जाते. बनावट चलन, अफू, गांजा, चरस, ब्राऊन शुगरसह अनेक मादक व अमली पदार्थांची खुलेआम तस्करी या ठिकाणावरून चालते. घातक शस्त्रांची तस्करीही येथून मोठ्या प्रमाणात चालते. गेल्या काही वर्षांत देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी अमली पदार्थांचा साठा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला आहे. या सगळ्याचे ‘माल्डा कनेक्शन’ तपासण्याची गरज आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी एका बांगला देशी घुसखोर महिलेला अटक केली होती. त्यावेळी तिच्याकडे असलेल्या बनावट कागदपत्रांवर चक्क हिंदू-मराठा नावाचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, या महिलेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान तर केलेच होते; पण ‘लाडक्या बहिणी’साठी सरकार देत असलेले पैसेही मिळविले होते. अशाच पद्धतीने राज्याच्या कोणकोणत्या भागात आणि कोणकोणत्या नावाने बांगला देशी घुसखोर राहत आहेत, याचा कुणाला थांगपत्ताही नाही. हळूहळू हे शासकीय योजनांचे लाभार्थी बनत आहेत, मतदान करत आहेत, उद्या निवडणुकीतही उतरतील. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे.