

सुनील कदम
कोल्हापूर : उद्या पाणी येणार नसेल तर आज पाणी जपून वापरायचे, अशी लोकांची मानसिकता असते; पण ती मानसिकता नेमकी उलट असायला पाहिजे, म्हणजे आज पाणी जपून वापरले तर उद्या नक्की पाणी येईल. राज्यात पाण्याची मुबलक उपलब्धता असूनही दरवर्षी पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्याचे कारण आहे जनतेतील जल साक्षरतेचा अभाव! यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना जलसाक्षर करण्याचा हा एक प्रयत्न...
पाण्याची प्रचंड उपलब्धता
राज्यात पाण्याची उपलब्धता कमी आहे का, तर अजिबात नाही. उलट राज्याच्या एकूण गरजेपेक्षा चौपटीहून अधिक पाणी राज्यात दरवर्षी उपलब्ध होते; पण जलसंचय आणि जल संधारणाच्या कामांचा अभाव, सर्वच पातळीवर होणारा पाण्याचा बेसुमार आणि बेजबाबदार वापर, शेतीसाठी होणारा पाण्याचा अशास्त्रीय आणि अफाट वापर, बेधुंद पद्धतीनेे केला जाणारा औद्योगिक वापर, घरगुती वापरासाठी असलेल्या पाण्याचा अंदाधुंद वापर, राज्यातील नद्या, तलाव, विहिरी आणि बहुतांश नैसर्गिक जलस्रोतांचे झालेले प्रदूषण, मोठ्या प्रमाणात होत असलेली जंगलतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास इत्यादी कारणांमुळे राज्यातील जनतेला दरवर्षी नित्यनेमाने पाणीटंचाईचा आणि काहीवेळा दुष्काळाचा मुकाबला करावा लागतो. वरील मार्गाने होणारा पाण्याचा अपव्यय नुसता टाळला, तरी राज्याला कधीही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही; पण याची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून करायला हवी.
...असे येते पाणी
राज्याला दरवर्षी सर्वाधिक पाणी उपलब्ध होते ते पावसापासून! पावसापासून दरवर्षी तब्बल ११ हजार ६५४ टीएमसी पाणी उपलब्ध होते. धरणांसह भूपृष्ठावर दरवर्षी साधारणत: ३,८४३ टीएमसी पाणी उपलब्ध होते. परराज्यांतून आपणाला जवळपास ३७८ टीएमसी पाणी मिळते. भूजलाचा होणारा उपसा आहे ७५३ टीएमसी आणि सुमारे १८५ टीएमसी पाण्याचे पुनर्निर्माण होते. अशा पद्धतीने राज्याला दरवर्षी तब्बल १७ हजार २६१ टीएमसी पाणी उपलब्ध होते.
...असे जाते पाणी
घरगुती वापर २७० ते ३०० टीएमसी, औद्योगिक वापर जवळपास १०० टीएमसी, सिंचनासाठी सुमारे २,४०० टीएमसी पाणी वापरले जाते, परराज्याला द्यावे लागणारे पाणी आहे ५०० टीएमसी. राज्याचा एकूण वार्षिक पाणी वापर आहे ३,३०० टीएमसी, मुबलक वापर केला तरी हे प्रमाण जाईल फार फार तर ४,००० टीएमसीवर. म्हणजे मुबलक पाणी वापर करूनही आपल्याकडे १३ हजार टीएमसी पाणी शिल्लक राहायला हवे; पण तसे न होता दरवर्षी पाण्यासाठी ठणाणा चालूच आहे. याची कारणे सर्वच पातळीवर होणाऱ्या पाण्याच्या नासाडीत दडलेली आहेत.