‘राधानगरी’त 40 टक्के जलसाठा; कोल्हापूर, सांगलीवर महापुराची टांगती तलवार!
सुनील कदम
कोल्हापूर : मान्सूनपूर्व पाऊस धुवाँधार हजेरी लावत असताना आणि पावसाळा तोंडावर आला असतानाही अद्याप धरणांमध्ये असलेला अतिरिक्त पाणीसाठा भविष्यात धोकादायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, या अतिरिक्त पाणीसाठ्यामुळे ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महापुराला निमंत्रण मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पाणी साठविण्याची पद्धत!
धरणांमध्ये कशा पद्धतीने पाणीसाठा करायचा याची ढोबळमानाने परंपरागत अशी एक पद्धत निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी म्हणजे साधारणत: 31 मे या तारखेला धरणांमध्ये केवळ 10 टक्के पाणीसाठा ठेवायचा असतो. पावसाळा सुरू झाल्यानंतर 15 जुलैपर्यंत धरणांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा करायचा. त्यानंतर 15 ऑगस्टपर्यंत धरणांमध्ये 75 टक्के पाणीसाठा करायचा आणि त्यानंतरचा पाऊस, परतीचा पाऊस आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाझराच्या पाण्यामधून ऑक्टेबरअखेरपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरून घ्यायचे, अशी ही परंपरागत पद्धत आहे.
सध्या अतिरिक्त पाणीसाठा!
मात्र, परंपरागत पद्धत डावलून सध्या सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील धरणांमध्ये पावसाळ्यापूर्वीच अतिरिक्त पाणीसाठा ठेवण्यात आलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि तुळशी धरणे तर आताच जवळपास निम्मी भरली आहेत. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणामध्येही जवळपास 25 टक्के पाणीसाठा आहे. सातारा जिल्ह्यातील कन्हेर, उरमोडी आणि वीर धरणामध्ये तर अद्याप 30 ते 35 टक्के पाणीसाठा आहे. कोयना धरणातही अद्याप 20 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा काहीसा जास्त आहे.
भविष्यातील धोका!
आता पावसाळा तोंडावर आला असून, तिन्ही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले आहे. शिवाय, यंदा मान्सूनलाही लवकर सुरुवात होणार असून, सरासरीपेक्षा जादा पाऊसमान होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचा अर्थ आगामी आठ-दहा दिवसांतच मान्सूनचे आगमन होऊ शकते. अशा परिस्थितीत आताच सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील धरणांमध्ये 20 ते 40 टक्के पाणीसाठा असेल, तर भविष्यात तो धोकादायक ठरू शकतो.
धरणे भरण्याचा धोका!
आताच धरणांमध्ये 20 ते 40 टक्के पाणीसाठा असेल, तर पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर राधानगरी, तुळशी, चांदोली, तारळी, धोम कन्हेर, उरमोडी आणि वीरसारखी छोटी धरणे जून महिन्याच्या महिल्या पंधरवड्यात पूर्ण क्षमतेने भरून गेल्याशिवाय राहणार नाहीत.
महापुराला निमंत्रण!
छोटी धरणे भरल्यानंतर त्यातील पाण्याचा तातडीने विसर्ग करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तशातच जर पावसाचा जोर असेल तर अशा परिस्थितीत महापुराला निमंत्रण मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही बाब विचारात घेता, या तीन जिल्ह्यांमधील धरणांमध्ये सध्या असलेला अतिरिक्त पाणीसाठा तातडीने कमी करण्याची आवश्यकता वर्तविण्यात येत आहे.

