

प्रा. सुनील डेळेकर
मुरगूड : ‘टीईटी’बरोबरच सेट परीक्षा पेपर फुटीचे आंतरराज्य पातळीपर्यंत लोण पसरल्याची धक्कादायक माहिती पुढे येत असल्याने पोलिस व प्रशासनासमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे. फुटलेले पेपर दीडशे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे समजते. त्यामुळे त्यांची चौकशी झाल्यास संबधित परीक्षार्थी विद्यार्थ्यांवर टांगती तलवार राहाणार आहे; अन्यथा अशा गैरप्रकारातून ते विद्यार्थी-शिक्षक मोकाट व प्रामाणिकपणे परीक्षा देणार्यावर परीक्षार्थींवर अन्याय ठरणार आहे.
टीईटी परीक्षा पेपर फुटीचे प्रकरणाचे सत्य बाहेर येण्याची आवश्यकता आहे, पण तपासात पोलिस यंत्रणेवर मोठा दबाव असल्याने तपास गुलदस्त्यातच आहे. त्यातील अंतिम सत्य बाहेर पडल्याशिवाय या प्रकरणाला न्याय मिळणार नाही. कारण या आरोपींच्या पाठीमागे बड्या राजकीय व्यक्तीपासून ते पेपर तयार करणार्या शिक्षण परिषद व परीक्षा नियंत्रण प्रशासनापर्यंत अनेकांचे हात गुंतल्याची चर्चा आहे. त्यामुळेच या प्रकरणाच्या पडद्याआड घडामोडी घडत आहेत.
कठीण पातळीवरील या परीक्षा अवघड असल्याने अनेक परीक्षार्थी रक्ताचे पाणी करून कष्टपूर्वक अभ्यास करून पास होण्यासाठी आटापिटा करतात. या परीक्षावरच आपली नोकरी व भवितव्य अवलंबून असल्याने परीक्षेतून हतबल होणारे परीक्षार्थी आत्महत्येपर्यंत मार्ग स्वीकारतात. अशा वास्तव परिस्थितीत दोन नंबरने परीक्षा देणारे विद्यार्थी त्यासाठी लाखो रुपये खर्च करतात व अशा परीक्षांचे पेपर फोडण्यातून कोट्यवधीची माया जमा करणारे आलिशान बंगल्यात राहून व आलिशान गाडीतून राजरोस फिरत आहेत, हे कशाचे द्योतक आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
परीक्षा पारदर्शक व्हाव्यात
सरकारने टीईटी व सेटसारख्या परीक्षा सक्तीच्या करून गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबले असले तरी अशा परीक्षा पारदर्शक होतात का? व त्यातून योग्य मूल्यमापन होते का? याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. अशा परीक्षा पारदर्शक झाल्या तरच यावरील विश्वास द़ृढ होईल, असे अनेकांचे मत आहे.