

कोडोली : पन्हाळा तालुक्यातील नावली येथे माजी सैनिकाने बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून मेहुण्यावर गोळीबार केला. विनोद अशोक पाटील (वय 40) यांच्या उजव्या मांडीला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कोडोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी माजी सैनिक नीलेश राजाराम मोहिते (45) याला अटक केली.
दरम्यान, प्रारंभी मोहिते याने पिस्तुलाची साफसफाई करताना चुकून गोळीबार झाल्याचा बनाव केला होता; पण कसून चौकशीत 10 वर्षांपूर्वी विनोद पाटील याने आपल्या बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातूनच त्याच्यावर गोळीबार केल्याची कबुली मोहितेने दिली. सोमवारी सकाळी मोहिते आणि पाटील यांच्यात जोरदार वाद झाला. यामुळे संतप्त झालेल्या मोहितेने विनोद पाटील यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या, त्यापैकी एक गोळी त्यांच्या उजव्या मांडीला लागली. पाटील यांना तातडीने कोडोली येथील यशवंत आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
माहिती मिळताच शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासो पवार आणि कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोहितेला अटक केली. घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग पुढील तपास करत आहेत.
म्हणे, पिस्तूल साफ करताना गोळी उडाली; पिस्तूल साफसफाई करताना गोळीबार झाल्याचा प्रथम बनाव
गोळीबारात एकजण जखमी झाल्याची बातमी वार्यासारखी नावली परिसरात पसरली. मोहिते याने पिस्तूलची साफसफाई करताना चुकून गोळी लागल्याचा प्रथम बनाव केल्याने पोलिसही संभ्रमावस्थेत होते. परंतु, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी अतिशय हुशारीने मोहिते याच्याकडे कसून चौकशी केली असता, आपणच मेहुणा विनोद पाटील याच्यावर गोळीबार केल्याची कबुली त्याने दिली.