

कुरुंदवाड : सध्या वाढत्या उष्णतेच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत असताना, पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा अधिकच महत्त्वाचा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाचे वकील धैर्यशील सुतार यांच्या टिश्यू पेपरविरोधातील फेसबुक पोस्टने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला असून, नागरिकांकडून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
टिश्यू पेपरच्या वाढत्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून, उत्पादन प्रक्रियेत प्रचंड पाण्याचा वापर होत असल्याचे सुतार यांनी आपल्या पोस्टमधून अधोरेखित केले आहे. त्यांच्या मते, २०२५ या वर्षात जगभरात सुमारे ५ कोटी टन टिश्यू पेपर कचऱ्यात टाकण्यात आला. एका टन टिश्यू पेपरसाठी १७ ते २४ झाडे तोडावी लागतात, तर सुमारे ७५ हजार लिटर पाणी खर्च होते.
या पार्श्वभूमीवर वर्षभरात अंदाजे १०० कोटी झाडांची कत्तल होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच अब्जावधी लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याने, वाढत्या उष्णतेच्या काळात ही बाब अधिकच चिंताजनक ठरत आहे.
दरम्यान, टिश्यू पेपरचा जागतिक व्यापार सुमारे १ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचेही नमूद करण्यात आले आहे. वाढत्या मागणीमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. “टिश्यू पेपर वापरताना आपण नकळत वृक्षतोडीत सहभागी होतो,” असे नमूद करत सुतार यांनी नागरिकांना कापडी रुमाल वापरण्याचे आवाहन केले आहे.
या पोस्टनंतर सोशल मीडियावर पर्यावरणाबाबत व्यापक चर्चा सुरू झाली असून, अनेकांनी टिश्यू पेपरऐवजी कापडी रुमाल वापरण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. दैनंदिन सवयींमध्ये छोटासा बदल करून पर्यावरण रक्षणाला हातभार लावता येऊ शकतो, हा संदेश या निमित्ताने अधोरेखित झाला आहे.
टिश्यू पेपरचा वाढता वापर पर्यावरणासाठी धोकादायक ठरत आहे. त्याच्या निर्मितीसाठी होणारी झाडांची तोड आणि पाण्याचा प्रचंड वापर लक्षात घेता, कापडी रुमालासारखे पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारणे ही आजची गरज आहे. छोट्या सवयींमध्ये बदल केल्यास मोठा सकारात्मक परिणाम साधता येऊ शकतो.
अभ्यासक प्रा. डॉ. रामेश्वर सपकाळ यांनी केले.