

सतीश सरीकर
कोल्हापूर : करवीरनगरीत येणाऱ्या पर्यटकांच्या आणि बाहेरील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिका क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या ‘एमएच ०९’ (MH-09) म्हणजेच कोल्हापूर जिल्हा पासिंगच्या वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व वाहनांवर ‘प्रवेश कर’ (एंट्री टॅक्स किंवा युजर फी) आकारण्यात यावा असा ठराव नगरसेवकांनी दाखल केला आहे. महापालिका प्रशासनाने त्यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी केली असून १७ जून रोजी महासभेत त्यावर निर्णय होणार आहे. महासभेने हिरवा कंदील दाखवल्यास प्रशासनाकडून प्रस्ताव तयार होऊन कोल्हापुरात येणाऱ्या परजिल्ह्यातील आणि परराज्यातील वाहनांना प्रवेश कर लागू केला जाणार आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १२७ ‘अ’ व ‘इ’ नुसार महापालिकेला आपल्या हद्दीत येणाऱ्या वाहनांवर युजर फी किंवा प्रवेश कर लावण्याचे कायदेशीर अधिकार आहेत. या अधिकाराचा वापर करून केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील (MH-09) वाहनांना या करामधून पूर्णपणे वगळण्यात येणार आहे. मात्र, पुणे, मुंबई, सांगली, सातारा किंवा कर्नाटकसह इतर कोणत्याही भागातून येणाऱ्या व्यावसायिक आणि खासगी वाहनांवर हा कर लागू केला जाईल. प्रशासनाने या कराची रचना, वसुलीची पद्धत (नाके की फास्टॅग आधारित यंत्रणा) आणि अपेक्षित उत्पन्न याबाबींचा सविस्तर अभ्यास करून प्रस्ताव करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पायाभूत सुविधांसाठी निधीचा तुटवडा...
शहरातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी महापालिकेकडे निधीचा तुटवडा नेहमीच जाणवतो. अशा स्थितीत स्थानिक नागरिकांवर मालमत्ता कर किंवा पाणीपट्टीत वाढ करण्याऐवजी बाहेरील वाहनांकडून निधी गोळा करणे अधिक सोयीचे ठरेल. ‘कोल्हापूरच्या रस्त्यांवर येणाऱ्या बाहेरील वाहनांमुळे महापालिकेच्या यंत्रणेवर ताण पडतो. पर्यटन आणि व्यवसायासाठी लोक बाहेरून येत असतील, तर शहराच्या विकासासाठी त्यांनी ‘युजर फी’ देणे गैर नाही, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे.
महापालिकेच्या तिजोरीत पडणार कोट्यवधींची भर
श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक, पर्यटन आणि व्यापारी केंद्रामुळे कोल्हापुरात दररोज हजारो वाहने दाखल होतात. शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी तर ही संख्या दुप्पट-तिप्पट होते. जर प्रत्येक वाहनाकडून नियमानुसार प्रवेश कर वसूल केला, तर महापालिकेला दरमहा कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. हा निधी थेट शहरातील रस्ते विकास, पार्किंग व्यवस्था आणि प्रदूषण नियंत्रणासाठी वापरता येणे शक्य होणार आहे.
मनपाच्या उत्पन्न वाढीचा नवा मार्ग..
कोल्हापूर हे ऐतिहासिक, धार्मिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. कोकण, गोवा व कर्नाटकात जाण्यासाठी महत्वाचे केंद्र आहे त्यामुळे येथे दररोज हजारो वाहने बाहेरून येत असतात. या वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि रस्त्यांची दुरवस्था होते. या पार्श्वभूमीवर, स्थानिक करदात्या कोल्हापूरकरांना कोणताही आर्थिक भुर्दंड न लावता महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा मार्ग शोधण्यात आला आहे.