

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच 18 ऑगस्टपासून कोल्हापुरात कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील व्यापारी, उद्योजक, वकील आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शनिवारी जिल्हा बार असोसिएशनच्या सभागृहात कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, विविध व्यापारी-उद्योग संघटनांच्या पदाधिकार्यांनी संयुक्त सर्किट बेंच निर्णयाचे स्वागत करून वकिलांचा सत्कार करून आनंदोत्सव साजरा केला.
चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी, सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी झालेल्या दीर्घ लढ्यात कोल्हापूर चेंबरने प्रारंभापासूनच सक्रिय सहभाग घेतला. अखेर ही लढाई यशस्वी झाली असून, अधिसूचना निघाल्यामुळे सर्व क्षेत्रांतील लोकांची मागणी पूर्णत्वास आल्याचे सांगितले.
असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स अध्यक्ष अजय कोराणे म्हणाले, सध्या कोल्हापुरात अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. अकराशे खाटांचे हॉस्पिटल, अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पन्हाळ्याचा युनेस्को सन्मान, शहर हद्दवाढ आणि कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे प्रकल्प प्रगतीच्या दिशेने पावले आहेत. सर्किट बेंच ही त्यात भर घालणारी घटना ठरणार असल्याचे सांगितले. इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन अध्यक्ष राहुल पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात कोल्हापूर इलाक्यात सर्वोच्च न्यायालय होते. आता 50 वर्षांच्या संघर्षानंतर पुन्हा न्यायिक सन्मान प्राप्त होत असल्याचे समाधान व्यक्त केले.
जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील म्हणाले, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह कोल्हापुरातील नागरिकांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला आहे. सर्किट बेंचसाठी प्रत्येक आंदोलनात कोल्हापूर चेंबरने साथ दिली आहे. माजी आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, गेली अनेक वर्षे आपण पाहिलेले स्वप्न आज साकारले आहे. हा निर्णय केवळ प्रशासकीय नाही, तर जनतेच्या एकजुटीचा आणि लढ्याचा विजय आहे. मी आमदार असताना सातत्याने सरकारकडे या मागणीसाठी पाठपुरावा केला होता. यावेळी अॅड. इंद्रजित चव्हाण, सीमा जोशी, विज्ञानंद मुंढे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, राजू पाटील, मानद सचिव प्रशांत शिंदे, खजिनदार राहुल नष्टे, प्लायवूड असोसिएशनचे संजय पाटील, विनोद पटेल, कापड व्यापारी संघाचे संपत पाटील, नारळ व्यापारी असोसिएशनचे अविनाश नासिपुडे, हॉटेल संघाचे उज्ज्वल नागेशकर, सोलर असोसिएशनचे अतुल होणोले, अॅड. रणजित गावडे, अॅड. महेश जाधव, अॅड. मनीषा सातपुते, सीए मंदार धर्माधिकारी, सीमा शहा, डी. डी. पाटील, पाणपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड. मनोज पाटील यांनी केले, तर आभार महादेवराव आडगुळे यांनी मानले.