Hassan Mushrif | ‘गोकुळ’चा विषय आता संपवा; ‘ते’ वक्तव्य रागापोटी, करायला नको होते

Hasan Mushrif
Hassan Mushrif | ‘गोकुळ’चा विषय आता संपवा; ‘ते’ वक्तव्य रागापोटी, करायला नको होते
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची अध्यक्ष निवड झालेली आहे. यापूर्वीही अनेकवेळा भूमिका व्यक्त करताना त्यामध्ये काय तांत्रिक बाब होती, याबाबत उल्लेख केलेला होता. यामुळे हा विषय आता संपवा. गोकुळ कसा चांगला चालेल आणि वाढेल यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया. तो अमूलला कशी स्पर्धा करेल यासाठीही काम करूया. गेल्या दीड-दोन महिन्यांत गोकुळ हा विषय संपूर्ण देशभर आणि जगभर पोहोचवलेला आहे. आता या विषयाला आपण सर्वजणच विराम देऊ या, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केले.

‘कोर्टाचा निकाल विरोधात गेला तर... या वक्तव्याबाबत बोलताना माझ्याही तोंडून रागापोटी ते वाक्य गेले. वास्तविक; ते गेलं नसतं तर बरं झालं असतं; परंतु ते गेलं. आता गोकुळ हा विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या महायुतीच्या नेत्यांच्या भाषणावर टीका होत असल्याबाबत विचारता मुश्रीफ म्हणाले, आमच्याकडून झालेली वक्तव्ये म्हणजे विरोधकांनी काढलेल्या संघर्ष मोर्चाबद्दल स्वाभाविक आणि सहज प्रतिक्रिया होती. मुख्यमंत्र्यांची अवमानजनक छायाचित्रे, त्यांच्याबद्दलची वक्तव्ये, तीन मंत्री, तीन खासदार, दहा आमदार यांचा बदनामी व अवमानकारक उल्लेखाने कार्यकर्ते संतप्त झाले होते.

मोर्चात भले मोठे पायताण आणले होते आणि ‘कोल्हापुरी बाणा पायताण हाणा’. वास्तविक मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना हे दिसलं पाहिजे होते. कारण; अशामुळे लोकात चीड निर्माण होते. मोर्चात यम आणला होता, त्या अर्थ तुम्ही सगळे जाणता आहात. तसेच; रेडाही आणला होता आणि ‘विरोधकांना रेडा दाखवूया’ अशी वक्तव्ये केली. या सगळ्यामुळे चंद्रकांतदादांना विरोधकांची काही वक्तव्ये आणि कृती पटलेली नाही, त्यामुळे तेही काही वाक्ये बोलले असतील, असेही मुश्रीफ म्हणाले.

आता सर्व संचालक मंडळाने एकत्र बसून गेल्या सहा महिन्यांत प्रशासकीय मंडळाच्या काळात जे चुकीचे निर्णय झाले ते बदलले पाहिजेत. मुंबईसह सर्वत्रच दर्जेदार व गुणवत्त दुधाची मागणी वाढलेली आहे. मुंबई, पुण्यासह इतरही बाजारपेठेत दर्जेदार दूध नेण्यासाठी अजूनही जादा दुधाची गरज आहे. यामुळे एकत्र बसावे आणि ३० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठण्यासाठी संघटित प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी सर्व संचालकांना केले.

सतेज पाटील समोरून आले तर नमस्कार-चमत्कार होणारच!

सतेज पाटील यांची राजकारणविरहित मैत्री कायम असेल काय, या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, आम्ही दोघेही कोल्हापुरातच राहणार आहोत, आम्ही काय एकमेकांचे जानी दुश्मन नाहीत. एखाद्यावेळी ते समोरून आले तर नमस्कार-चमत्कार होणारच. तसेच; ते माझ्यापेक्षा वयानेही लहान असल्यामुळे त्यांना मला नमस्कार करावाच लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.