कोल्हापूर : प्रभू श्रीरामांनी 14 वर्षांचा वनवास सहन केला. तुम्ही त्यापेक्षाही एक वर्ष जादा वनवास सहन केला आहे. आता बदल घडवायचा आहे, परिवर्तन घडवायचे आहे, यामुळे काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा हा वनवास आता संपवा, असे सांगून कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी सायंकाळी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या शिवसैनिकांच्या विराट सभेत केले. तत्पूर्वी, शहरात शिवसेनेने रोड शो करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
ही प्रचार सभा आहेच, तशीच ती विजयाचीही सभा आहे असे सांगत शिंदे म्हणाले, कोल्हापूर ही कुस्ती पंढरी आहे, येथे प्रत्येकजण माती लावून चितपट करायला येतो. विरोधकांना चितपट करण्यासाठी महायुतीचे धुरंधर मैदानात उतरले आहेत. येथे मैत्री केली तर ती शंभर टक्के जीवाला जीव देणारी. दुश्मनी केली तर ती थेट समोरासमोर; पण काहींनी पाठीमागून वार केले. विकासाच्या शत्रूंवर आता जनता 15 तारखेला सांगून वार करणार आहे. राज्यात असलेली महायुती कोल्हापुरात अवतरली आहे. तिन्ही पक्ष एकत्र आहेत, यामुळे 16 तारखेला विजयाचा गुलाल आपल्याला उधळायचा आहे.
कोल्हापूरला सम्राटांची सवय आहे. कोणी साखरसम्राट, कोणी शिक्षणसम्राट आहेत; पण महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आहेत. महायुतीचे शिलेदार जनतेचे सेवक आहेत. येथे काहीजण स्वत:ला मालक समजतात आणि तुम्हाला सेवक; पण आमच्यासाठी जनताच मालक आहे. महायुतीचा विकास हाच अजेंडा आहे. राज्याला गती देण्याचे काम आम्ही करत आहोत. त्यातून लाडकी बहीण, लेक लाडकी, एस.टी.त सवलत अशा कितीतरी योजना आणल्या. लाडकी बहीण योजनेविरोधात काहीजण कोर्टात गेले, काहींनी खोडा घातला; पण लाडक्या बहिणींनी खोडा घालणार्यांना कोल्हापुरी चपलाचा जोडा दाखवला. या लाडक्या बहिणींनी विधानसभेत चमत्कार घडवला, आता महापालिकेतही तोच चमत्कार घडवा, असे आवाहन करत, कोणी माय का लाल जरी आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूरची अस्मिता जपण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले आहे असे सांगत शिंदे म्हणाले, तांबडा-पांढरा रस्सा यापलीकडेदेखील कोल्हापूर आहे. शैक्षणिक आणि औद्योगिकनगरी म्हणूनही कोल्हापूरची ओळख आहे. सहकारची पंढरी आहे. कला, क्रीडाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. मात्र, काँग्रेसने 15 वर्षे वाया घालवली. कोल्हापुरातील संस्कृतीच्या खुणा 15 वर्षांत लोप पावल्या आहेत. कोल्हापूरचे हे वैभव पुन्हा मिरवायचे आहे, त्यासाठी या शहराच्या विकासाला नवतेजाची आवश्यकता आहे अन् हे नवतेज फक्त महायुतीच देईल. विकास घडवायचा असेल, परिवर्तन करायचे असेल, बदल घडवायचे असतील, तर काम करणार्या महायुतीशिवाय पर्याय नाही. कोल्हापूरच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. पैशांअभावी कोल्हापूरच्या विकासाचे एकही काम आम्ही थांबू देणार नाही. कोल्हापूरला स्मार्ट बनवण्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे, ती द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, उमेदवार उपस्थित होते.
मी कोल्हापूरकरांना विचारले, ‘कुछ लेते क्यू नहीं...’
15 वर्षे भ्रष्टाचाराने त्रस्त असलेल्या कोल्हापूरकरांना मी विचारले, ‘कुछ लेते क्यू नहीं...’ त्यावर ते म्हणाले, ‘हम कसम लेते हैं की सत्ता महायुती को देंगे...’ असे सांगत काम करणार्यांच्या हातात संधी दिली पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.