

कोल्हापूर ः गेली अनेक महिने झोपेचे सोंग घेतलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निमूर्र्लन पथक आणि विभागीय कार्यालयांंनाही जाग आल्याने शहरात मंगळवारी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवत पार्वती टॉकीज सिग्नल चौक, चिमासाहेब चौक सिग्नललगतची तसेच सीपीआर समोरची अतिक्रमणे हटविली. या तिन्ही ठिकाणच्या कारवाईत 20 टपर्या हटविल्या तर 4 टपर्या महापालिकेने जप्त केल्या. दैनिक ‘पुढारी’तून प्रसिद्ध होणार्या ‘कोल्हापूर अडकलंय टपर्यांमध्ये’ या वृत्तमालिकेमुळे महापालिकेचे प्रशासन खडबडून जागे झाले असून पोलिस बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटविण्यात आली. काही ठिकाणी फेरीवाल्यांसोबत किरकोळ खटके उडाले.
कोल्हापूर शहरात सर्वत्र अतिक्रमणांची संख्या वाढत चालली आहे. प्रत्येक रस्त्यावर चौकात अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. सिग्नलच्या भर चौकातही अतिक्रमणे असल्याने सिग्नल व्यवस्थाही कोलमडून पडते. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांच्या संयुक्त बैठकीत शहर अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मगंळवारी सकाळी दोन ठिकाणांहून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यामध्ये पार्वती चौकात सिग्नलला लागून असलेल्या हातगाड्या हटविण्यात आल्या. काही हातगाड्या आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या प्रवेशद्वाराकडे सरकविण्यात आल्या. येथील काही फेरीवाले हे बायोमेट्रिक कार्डधारक असल्याने काहीच्या हातगाड्या चौकातून आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या प्रवेशद्वाराकडे सरकविण्यात आल्या. सध्या तरी या हातगाड्या सरकलेल्या दिसत असल्या तरी हळूहळ करत पुन्हा त्या चौकाच्या दिशेने येत असल्याने नागरिकांनी चौकातील हातगाड्या काढण्याचे स्वागत केले असले तरी पूर्णपणे ही अतिक्रमणे हटली नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. चिमासाहेब चौकातून बुधवारपेठेकेडे जाणार्या रस्त्यावर भर चौकातच फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या हटविण्यात आल्या. येथील सुमारे 20 हून अधिक हातगाड्या हटवून चौक रिकामा केला आहे.