

आजरा : सिरसंगी (ता. आजरा) येथे पहाटे तीनच्या सुमारास हत्तीने गावात घुसून घराशेजारी उभी केलेली स्कूल बस उलटून टाकली. तर ओमनी कारची पाठीमागील काच फोडली. या घटनेमुळे सिरसंगीसह तालुक्यात खळबळ उडाली असून, हत्तीच्या उपद्रवामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सिरसंगीसह किणे परिसरातील हत्ती व गव्यांकडून पीक नुकसानीचे सत्र सुरूच आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पंधरा दिवसांत सुमारे 4 ते 5 एकर शिवारातील ऊस खोडवा पीक गव्यांकडून फस्त झाले आहे. यामुळे शेती करायची की नाही? असा प्रश्न शेतकर्यांसमोर पडला आहे.
रविवारी पहाटे तीनच्या सुमारास बाबुराव बुडके यांच्या घराशेजारी गडहिंग्लजच्या श्रीपतराव शिंदे शिक्षण समूहाची बस लावण्यात आली होती. हत्तीने ती बस उलटी करून बाहेर फेकली गेली. अनिल निकम यांची ओमनी कार काजू फॅक्टरीशेजारी उभी केली होती. तिची काच पाठीमागून फोडली.
गेले दहा दिवस हत्तीकडून शेतात असलेले पाईपलाईन, पाण्याची टाकी, केळी, काजूच्या झाडांचे नुकसान होत आहे. दरम्यान, दहा दिवसांपूर्वीही दशरथ येलगार यांच्या शेडशेजारी उभ्या केलेल्या बैलगाडीचे नुकसान केले होते. दररोजचे होणारे पिकांचे नुकसान व वन विभागाकडून मिळणारी तुटपुंजी नुकसानभरपाई यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. वन विभागाने आमची शेतीच भाडेतत्त्वावर घ्यावी व आमचे पालनपोषण करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
फिरत्या पथकाला चकवा
वन विभागाचे फिरते पथक रात्रीचे गस्त घालत असते. फिरत्या पथकाला चकवा देऊन हत्तीने स्कूल बस व ओमणी गाडीचे नुकसान केले. त्यामुळे फिरते पथक कुठे असते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.