Kolhapur Municipal Corporation |भाजपच्या रूपाराणी निकम होणार नव्या महापौर?

उपमहापौरपदी अक्षय जरग निश्चित
Kolhapur Municipal Corporation
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात तब्बल वर्षाच्या खंडानंतर नगरसेवक बसणार आहेत. त्यासाठी नवीन खुर्च्यांनी आणि रंगरंगोटीने सभागृह सज्ज करण्यात आले आहे. शुक्रवारी सभागृहात महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक होऊन 2026-2031 या पंचवार्षिक सभागृहातील कामकाजाला सुरुवात होणार आहे. गुरुवारी सायंकाळी सभागृहाचे घेतलेले छायाचित्र.(छाया : अर्जुन टाकळकर)
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदासाठी शुक्रवारी (दि. 6) निवडणूक होत आहे. महायुतीकडे 46 इतके संख्याबळ असल्याने भाजपच्या उमेदवार रूपाराणी निकम यांचा विजय होऊन त्या महापौर होणार हे स्पष्ट आहे. तसेच उपमहापौरपदी अक्षय जरग हे निश्चित आहेत. शुक्रवारी फक्त मतदान होऊन त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल.

काँग्रेसकडून शेंडे व कदम रिंगणात

महापौरपदासाठी निकम यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या सचिन शेंडे तर उपमहापौरपदासाठी जरग यांच्याविरुद्ध काँग्रेसचे दुर्वास कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी 11 वाजता निवडणूक होत आहे. महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसकडे 34 तर ठाकरे सेनेचा एक असे एकूण 35 नगरसेवक आहेत. महायुतीकडे भाजप 26, शिवसेना 15, राष्ट्रवादी 4 आणि जनसुराज्य शक्ती पक्ष एक असे एकूण 46 नगरसेवक आहेत. त्यामुळे महायुतीचा विजय सुकर आहे.

पक्ष कार्यालयातून नगरसेवक येणार मनपात

जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा सुरू असल्याने अनेक नगरसेवकांवर कोल्हापूर शहर परिसरातील मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांना सर्वच पक्षांनी सहलीवर नेण्याचे टाळले. दोन दिवसांपूर्वी एखादा दिवस तरी सहलीवर नेण्याचे नियोजन केले होते. परंतु नगरसेवक प्रचारात गुंतल्याने बाहेर गेले नाहीत. भाजपचे नगरसेवक सकाळी भाजप कार्यालयात एकत्रित जमून तेथून महापालिकेत येणार आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीचे नगरसेवक शनिवार पेठेतील शिवालय तर काँग्रेसचे नगरसेवक अजिंक्यतारा कार्यालयातून एकत्रित महापालिकेत येतील.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने लागू केला व्हिप

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस आदी पक्षांनी आपापल्या पक्षातील नगरसेवकांना गुरुवारी (दि. 5) व्हिप लागू केला. महापालिकेत महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी हात उंचावून मतदान असणार आहे. व्हिप लागू केल्याने त्या त्या पक्षातील नगरसेवकांना त्यांच्या उमेदवारांना मतदान करणे बंधनकारक राहणार आहे. अन्यथा पक्षाच्या व्हिपविरुद्ध मतदान केल्यास त्या त्या पक्षाचे गटनेते संबंधितांविरुद्ध नगरसेवकपद रद्दची कारवाई करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news