

कोल्हापूर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम असल्याने पाच वर्षांत काय केले, हे सांगायलाच हवं. मंगळवारी (दि. 17) होणार्या सुनावणीवर गोकुळ निवडणुकीचा निर्णय अवलंबून आहे. निवडणूक घ्यायची, पुढे ढकलायची की पावसाळ्यानंतर घ्यायची, असा सवाल करत आ. सतेज पाटील यांनी सध्या सरकार म्हणेल तसंच निवडणुकांमध्ये घडतंय, असा चिमटा काढला. यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, सतेज पाटील यांनी प्रचाराच्या निमित्ताने गेल्या पाच वर्षांतील गोकुळचा इतिहास सांगितला आहे. आ. चंद्रदीप नरके यांनी माजी आमदार के. पी. पाटील हे गुरुस्थानी असल्याचे सांगत तुम्ही काय निर्णय घ्यायचा ते तुम्हीच ठरवता, असे म्हटले. या तिन्ही नेत्यांमधील राजकीय जुगलबंदी रविवारी ‘गोकुळ आईस्क्रीम’च्या शुभारंभाच्या निमित्ताने रंगली.
महायुतीच्या भांडणात भैया, तुम्हाला लॉटरी लागेल असे वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला आम्हीच (काँग्रेस) पर्याय आहे, असे म्हणत सतेज पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. माजी आमदार राजेश पाटील यांच्यासोबत गोकुळ डेअरी येथील श्रीकृष्ण मंदिरात जाऊन आल्याचे सांगताना आम्ही दोघे फक्त प्रामाणिक कर्म करत राहणार, फळाची अपेक्षा करणार नाही. 17 रोजी होणार्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत त्यांना याचे फळ मिळते का बघू, नेत्यांनी नाही ऐकले, तर त्यांच्या साथीला आम्ही आहोतच असे म्हणताच मंत्री मुश्रीफ यांनी, आमच्यात भांडणं लावताय का, अशी विचारणा केली. भांडण नाही लावत, सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केल्याचा खुलासाही पाटील यांनी केला. मुश्रीफ म्हणाले, गोकुळचे संचालक सतेज पाटील यांच्यापेक्षा माझ्यावर अधिक नाराज आहेत. मी तोंडावर बोललो; पण तुम्ही सोनं घ्या सोन्यासारखं राहा म्हणालात. आम्ही गाड्या बंद केल्या, हॉटेल्स बंद केली. जिल्हा बँकेत जे केले, ते गोकुळमध्येही केले.
म्हशीचे दूध कुठे गेले?
म्हैस दूधवाढीसाठी गोकुळने 50 हजार, तर जिल्हा बँकेने 10 हजार रुपये अनुदान दिले. 12 हजार म्हशी खरेदी केल्या; पण दूध केवळ 43 हजार लिटर वाढले. प्रतिम्हैस 10 लिटर धरले, तरी 1 लाख 20 हजार लिटर वाढ अपेक्षित होती. मग हे दूध गेले कुठे? हे दूध गोकुळलाच आलं पाहिजे. अजून निवडणूक नाही. तेव्हा गोकुळमध्ये लक्ष घाला, अशी कानउघाडणीही मंत्री मुश्रीफ यांनी केली.
मुलाच्या लग्नात गोकुळची बासुंदी
गोकुळचे नेतृत्व करताना आम्हीही गोकुळची उत्पादने वापरली पाहिजेत. मुलगा तेजसच्या लग्नात गोकुळची बासुंदी खरेदी करणार आहे. यासाठी 12 लाखांचा धनादेश कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्याकडे दिला. नाही तर बाळासाहेब खाडे म्हणतील, पैसे मिळाले नाहीत, असा टोलाही आ. सतेज पाटील यांनी लगावला.