Kolhapur News : राजकीय मरगळ संपली; आता सत्तेसाठी चुरस

लोकप्रतिनिधी नसल्याने प्रभागातील विकासही होता ठप्प
election preparations political parties active again
Kolhapur News : राजकीय मरगळ संपली; आता सत्तेसाठी चुरसPudhari File Photo
Published on
Updated on
डॅनियल काळे

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या 2015 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत नोव्हेंबर 2020 मध्ये संपली. तेव्हापासून आजअखेर महापालिकेमध्ये प्रशासकराज असून तीन प्रशासकांनी कार्यभार केला. महापालिकेच्या कारभाराला मरगळच आली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळे पुन्हा लोकप्रतिनिधी सभागृहाद्वारे शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होतील. त्यामुळे महापालिकेची मरगळ झटकणार आहे. गेली पाच वर्षे निवडणुकीची प्रतीक्षा करणार्‍या राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांतून आता हालचाली गतिमान होणार आहे.

महापालिकेच्या कारभाराला मरगळच आली आहे. महापालिकेचा कारभार प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही दोन चाके मिळून चालवितात. परंतु गेल्या पाच वर्षांत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनानेच एकमार्गी हा कारभार केला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळे निवडणुका होऊन नवीन सभागृह होण्याचा मार्ग मोकळा झाला असून महापालिकेची मरगळ संपणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अशा दोन चाकामार्फत हा कारभार केला जाईल.

ठप्प विकासकामे आणि नागरिकांचे प्रश्न

पाण्याचा असमान पुरवठा, खड्ड्यात गेलेले रस्ते, गटारींची दुर्दशा, कचर्‍याचे ढीग आणि अपुरे आरोग्य सेवा केंद्र यांसारख्या नागरी समस्यांनी शहरात काही काळ थैमान घातले आहे. अनेक प्रभागांत नागरिकांनी थेट प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्या समस्यांची दखल घेण्यात दिरंगाई झाली.

नगरसेवक परतणार, प्रभागांना मिळणार नवा आवाज

महापालिकेच्या कारभारात नगरसेवकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रभागातील नागरिकांचा तो एक प्रकारे पालक असतो. अगदी गटार तुंबण्यापासून ते रस्ते बांधणीपर्यंत नगरसेवक लोकांचा आवाज सभागृहात उठवितात. त्यामुळे प्रभागातील समस्यांना न्याय मिळतो. प्रभागात एखाद्या नागरिकांचे निधन जरी झाले तरी त्याचा दहन दाखला देण्यापासून अनेक कामात नगरसेवक महत्त्वाचा दुवा आहे.

हालचालींना वेग

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महापालिका राजकारणाचे संदर्भ बदलणार आहेत. गेली 15 वर्षे महापालिकेच्या राजकारणावर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांचे वर्चस्व होते. आता बदलत्या राजकीय समीकरणात मुश्रीफ हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याने ते महायुतीचे घटक आहेत. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक हे आता ताराराणी आघीडीऐवजी भाजप म्हणून लढतील. शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर पुन्हा विधानसभेवर निवडून आल्याने त्यांची ताकद महत्त्वाची आहे; तर अजित पवार गटानेही शहरात व्यूहरचना करायला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत महायुती मोठे आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू आहे. काँग्रेस आणि त्यांचे नेते आमदार सतेज पाटील यांना सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न होणार आहे; तर सतेज पाटील हे देखील हे चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न करणार. पण महापालिकेच्या राजकारणात त्यांना नवा सोबती घ्यावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news