

कोल्हापूर : बाजार समितीची सभापतिपदाची निवड सोमवारी राजकीय टोलेबाजीने चांगलीच रंगली. सुयोग वाडकर यांनी सतेज पाटील यांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर राजकीय टोलेबाजीला सुरुवात झाली, ती सभा संपेपर्यंत चालली. नंदकुमार वळंजू यांनी आपल्या भाषणात बोलताना गेल्या 27-28 वर्षांत आपण खूप सभापती पाहिलेत. परंतु, मावळते सभापती अॅड. प्रकाश देसाई यांच्यासारखा सभापती पाहिला नाही, असे सांगितले. समारोप करताना नूतन सभापती सूर्यकांत पाटील यांनी आपणही महापालिकेत अनेक महापौर पाहिलेत, छत्रपती शिवरायांचा पुतळा आपण गावात उभारला तसा पुतळा उभारण्याचे एकाही बहाद्दराला आजपर्यंत का सुचले नाही? असा टोला लगावला.
सुयोग वाडकर यांनी आपल्या भाषणात आमदार सतेज पाटील यांच्याशिवाय राजकारण होऊच शकत नाही. त्या व्यक्तीने जिल्ह्याच्या राजकारणात बड्या बड्या नेत्यांशी संघर्ष करत आपले स्थान निर्माण केले आहे. राजकारणात चढ-उतार असतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे सांगितले. नंदकुमार वळंजू म्हणाले, गेल्या 27-28 वर्षांत आपण अनेक सभापती पाहिलेत. भुयेकर यांचे वर्ष अभ्यास करण्यात गेले. प्रकाश देसाई यांनी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला.
बाजार समितीचे उत्पन्न 25 वरून 50 कोटी करणार, असे कितीतरी वेळा सूर्यकांत पाटील आपण यापूर्वी म्हणाला आहात. त्यामुळे तुम्ही दिसला की, आम्हाला 50 कोटी आटवतात. आता तुम्ही सभापती झाला आहात. उत्पन्न वाढवा, त्यासाठी आमचे संपूर्ण सहकार्य राहील. उंची कमी असलेली माणसं अत्यंत हुशार असतात, असे म्हणतात. व्यापार्यांचे नेहमीच तुम्हाला सहकार्य राहील. बाळासाहेब पाटील यांनी राजकीय चर्चा करण्याचे हे व्यासपीठ नसल्याचे सांगितले. समारोप करताना सभापती सूर्यकांत पाटील म्हणाले, गावात उभा केलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा हे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे काम. वळंजू यांनी सांगितले, आपण महापौर होतो.
आतापर्यंत 60 महापौर झाले असतील, त्यातील 35 आपले मित्र होते. परंतु, एकाही बहाद्दराला पुतळा उभा करण्याचे सुचले नाही, असा टोला वळंजू यांना लगावला. उत्पन्न वाढीच्या वळंजू यांच्या मुद्द्यावर बोलताना, कागदावर 10 कोटींची उलाढाल आणि जीएसटीकडे 100 कोटींची उलाढाल, असे दिसून आले आहे. यातदेखील बदल करावयाचा आहे, त्यासाठी व्यापार्यांनी साथ द्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले. भारत पाटील-भुयेकर यांनी निवडीच्या सभेत वैयक्तिक टीकाटिपणी टाळावयास हवी होती. चांगले काम करण्याचा प्रयत्न केला; पण साथ मिळाली नाही. दोन व्यापार्यांच्या नादात शेतकर्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असा चिमटा त्यांनी काढला.
कमी उंचीचे लोक अत्यंत हुशार असतात, असे नंदकुमार वळंजू आपल्या भाषणात म्हणताच सभापती सूर्यकांत पाटील हे वाक्य मला उद्देशून म्हणता की, सतेज पाटील यांच्याबाबत बोलता, असे म्हणताच सभागृहातील वातावरण गंभीर बनले होते.