कोल्हापूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समित्यांच्या 136 मतदारसंघांसाठी शुक्रवारपासून रणधुमाळी सुरू होणार आहे. दि. 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. दि. 21 जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार असून, अखेरच्या तीन दिवसांत गर्दी होण्याची शक्यता आहे. निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्ष, नेत्यांसह इच्छुकांची धावपळ उडाली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी गुरुवार, दि. 5 फेब—ुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. यासाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. दि. 16 ते दि. 21 जानेवारी या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज भरता येणार आहेत. दि. 22 रोजी छाननी होणार असून, दि. 27 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. अर्ज माघारीनंतर लगेचच चिन्हवाटप केले जाणार आहे. या निवडणुकीसाठी तालुकानिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांची
कार्यालये सुरू केली जाणार आहेत. त्याबाबतचा आदेश गुरुवारी (दि. 15) काढण्यात येणार आहे. या निवडणूक कार्यालयात त्या तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदारसंघांसाठीची सर्व निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे.
निवडणूक जाहीर होताच, इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्ष आणि नेत्यांचीही धावपळ उडाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास तीनच दिवसांत सुरुवात होणार असून, त्याकरिता पाच दिवसांचाच अवधी आहे. बहुतांशी राजकीय पक्षांनी उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखतींचे टप्पे पूर्ण केले आहेत. एकीकडे आता महायुती आणि महाविकास आघाडी निवडणुका एकत्र लढवणार की स्वतंत्रपणे लढवणार का, अन्य वेगवेगळ्या आघाडीच्या माध्यमातून नवी समीकरणे उदयास येणार, यावर उमेदवारी ठरणार आहे; तर दुसरीकडे वेळ कमी असल्याने इच्छुकांची धडधड वाढली आहे.
या निवडणुकीत एका मतदाराला दोन मते द्यावी लागणार आहेत. एक मत जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी, तर एक मत पंचायत समितीच्या उमेदवाराला द्यावे लागणार आहे.