Truck Accident | भरधाव ट्रकच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; नात जखमी

कबनूरमधील घटना
Truck Accident |
Truck Accident | भरधाव ट्रकच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; नात जखमी
Published on
Updated on

इचलकरंजी : भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात रहिमतुल्ला आलम पठाण (वय ६०, रा. दत्तनगर गल्ली क्र.१३) यांचा मृत्यू झाला. त्यांची नात सुपेरा अकबर शेख जखमी झाली. हा अपघात कबनूर चौकात बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास घडला. याची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी ट्रकचालक सौरभ शिवाजी चव्हाण (रा. शिरगाववाडी, कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

रहिमतुल्ला पठाण सकाळी नात सुपेरा हिला घेऊन महाविद्यालयात सोडण्यासाठी इचलकरंजी बसस्थानकाकडे निघाले होते. कबनूर चौकात कोल्हापूरकडून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकल चिरडली गेली, तर पठाण हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम इंदिरा गांधी इस्पितळात, तर पुढील उपचारासाठी मिरज येथे हलवण्यात आले होते; मात्र उपचार सुरू असताना दुपारी त्यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. पठाण हे यंत्रमाग कामगार होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, नात असा परिवार आहे.

नातीची चिंता

रहिमतुल्ला पठाण यांची सुपेरा ही नात लाडकी होती. दररोज तिला ते बसस्थानकावर सोडण्यासाठी जात होते. नेहमीप्रमाणे आजही तिला सोडण्यासाठी जाताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. गंभीर जखमी अवस्थेतही पठाण यांनी सुपेराची चौकशी केली. त्यामुळे मृत्यूशी झुंज देतानाही नातीची चिंता त्यांना होती. अपघातावेळी त्याची नातीशी झालेली भेट अखेरची ठरली. याची घटनास्थळी चर्चा होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news