

कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) परिसरातील नंदिनी जाधवनगर येथील कार्यक्रमासाठी जनरेटर घेऊन जात असताना ट्रॉलीला लावलेला दगड अचानक निसटल्याने ट्रॉली अंगावरून जाऊन फुलेवाडी येथील जनरेटर व्यावसायिक सदाशिव नारायण पाटील (वय 60, रा. दुसरा बसथांबा) यांचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली.
करवीर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. सदाशिव पाटील यांच्यासह मुलाचा जनरेटरचा व्यवसाय आहे. व्यवसायात मुलाच्या मदतीसाठी वडील जात. शनिवारी रात्री जाधवनगर येथे एका कार्यक्रमासाठी जनरेटर पोहोच करण्यासाठी ते गेले होते. वाटेत उतारावर जनरेटरचा ट्रॅक्टर अडकला. ट्रॉलीच्या चाकाला दगड लावून ट्रॅक्टर सोडविण्यात आला.
मात्र, अचानक चाकाला लावलेला दगड निसटला. ट्रॉली मागे येऊ लागली. चाकाला पुन्हा दगड लावत असतानाच ट्रॉलीचे चाक पाटील यांच्या अंगावरून गेले. यात त्यांच्या छातीला गंभीर इजा झाली. तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.