kolhapur | अटकेच्या भीतीने वृद्धाला 11.5 लाखांचा गंडा

सायबर भामट्यांची पोलिस असल्याची बतावणी : तीन महिन्यांनी फिर्याद
Fraud Case |
kolhapur | अटकेच्या भीतीने वृद्धाला 11.5 लाखांचा गंडा(File Photo)
Published on
Updated on

कोल्हापूर : सायबर भामट्यांनी मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ तपास अधिकारी असल्याचा बनाव करीत मोरेवाडी - आर. के. नगर (ता. करवीर) येथील पीठ गिरण व्यावसायिकाला अटकेची भीती घालून 11 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीला आला.

किरण नृसिंह नाडगौंडा (64, रत्नाप्पाण्णा कुंभारनगर, ता. करवीर) यांनी दोन अनोळखी सायबर भामट्यांविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 14 ते 28 फेब—ुवारी या काळात हा प्रकार घडला. तीन महिन्यांनंतर गुन्हा दाखल झाला आहे.

सायबर भामट्यांनी नाडगौंडा यांच्या मोबाईल व व्हॉटस्अपवर व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधला. कॅनरा बँकेच्या ठाणे येथील शाखेतील खात्यावर तुम्ही बेकायदा व्यवहार केल्याचे सांगितले. ही रक्कम कुठून, कोणाकडून आणि कशासाठी जमा करण्यात आली, अशी विचारणा करीत या बेनामी व्यवहाराची मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून गोपनीय चौकशी सुरू असल्याचे सांगितले. चौकशी सुरू असताना आपणाकडून प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्यास कोणत्याही अटक होऊ शकते, अशी भामट्यांनी भीती घातली. शिवाय या प्रकरणात अटक वॉरंटही काढण्यात आल्याचे सांगितले.

पत्नीसह कुटुंबातील सदस्यांच्या नावे अन्य बँकेत असणारी रक्कम वीरशैव बँकेत घेण्यास भामट्यांनी सांगितले. त्यानंतर या रकमा वेगवेगळ्या खात्यावर ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. अडीच लाख, 7 लाख आणि त्यानंतर 2 लाख असे एकूण 11 लाख 50 हजारांची रोकड जमा केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक आरांक्षा यादव, हवालदार राहुल देसाई, अविनाश कांबळे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news