

बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील किसरूळ परिसरात गव्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बंडा पांडू खोत (82) या वृद्ध शेतकर्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून वन विभागाच्या ढिसाळ कारभाराबद्दल शेतकर्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास बंडा खोत हे खापर मळा येथील आपल्या शेतात जनावरांसाठी वैरण आणण्यास गेले होते. मात्र सायंकाळ झाली तरी ते घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी शोध सुरू केला. रात्री साडेआठच्या सुमारास ते शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. गव्याने केलेल्या हल्यामुळे त्यांच्या छातीवर, पोटावर आणि पायांवर गंभीर जखमा झाल्या असल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. खोत यांना तातडीने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जखमा खोल असल्याने शनिवारी पहाटे त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
घटनेचा पंचनामा करण्यासाठी वनपाल राजेंद्र रसाळ, वनरक्षक व वनमजूर घटनास्थळी पोहोचले होते. पंचनामा सुरू असतानाच शेतात दबा धरून बसलेल्या गव्याने अचानक वनविभागाच्या पथकावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गव्याने कर्मचार्यांचा पाठलाग केला, मात्र प्रसंगावधान राखत सर्वांनी सुरक्षित स्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
आता तरी डोळे उघडा; शेतकर्यांचा निर्वाणीचा इशारा
किसरूळ परिसरात महिनाभरातील ही दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वी पोर्ले तर्फ बोरगाव येथील संदीप काटकर यांच्यावरही गव्याने हल्ला केला होता. शेतात जाणे आता जीवावर बेतत आहे. वन विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. जर गव्यांचा बंदोबस्त होत नसेल, तर त्यांना मारण्याची परवानगी तरी द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. पन्हाळा परिक्षेत्राचे वनाधिकारी अजित माळी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून गव्याला सुरक्षितरीत्या जंगलात हुसकावण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत, असे संगीतले.