

कोल्हापूर : भरधाव कारने ठोकरल्याने वृद्ध पादचार्याचा जागीच मृत्यू झाला. विलास महादेव हावळ (वय 75, रा. मोहिते कॉलनी, कळंबा, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. महासैनिक दरबार हॉल-सर्किट हाऊस मार्गावर गुरुवारी दुपारी ही घटना घडली. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला.
राज्य विद्युत वितरण कंपनीतून निवृत्त झालेले हावळ हयातीचा दाखला काढण्यासाठी कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाकडे सर्किट हाऊस- महासैनिक दरबार हॉलमार्गे दुपारी साडेबारा वाजता चालत जात होते. भरधाव आलेल्या मोटारीने जोरदार धडक दिल्याने हावळ रस्त्यावर काही अंतर फरफटत गेले.
गंभीर दुखापत झाल्याने हावळ काहीकाळ रस्त्यावर पडून होते. नागरिक, शाहूपुरी पोलिसांनी बेशुद्धावस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चालक वाहनासह पसार झाला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा छडा लावण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.