

इचलकरंजी : डिजिटल अरेस्टची भीती दाखवून अण्णासो व्हनगोंडा पाटील (वय 79, रा. टाकवडे वेस) या वृद्धाची 54 लाख 85 हजार 624 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात दोघा अनोळखींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद अण्णासो पाटील यांनी दिली.
टाकवडे वेस परिसरात राहणार्या अण्णासो पाटील यांना 7 ते 20 नोव्हेंबरदरम्यान वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्या व्यक्तीने पाटील यांना फोन करून मुंबईतील कॅनरा बँकेतून त्यांच्या आधार कार्डचा वापर करून कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढण्यात आले आहे. त्यापोटी 20 टक्के कमिशन पाटील यांना दिले असून, या प्रकरणात अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण केवळ महाराष्ट्रात नव्हे तर अनेक राज्यांत घडले असून, या संदर्भात बँक खात्याची चौकशी करणार असल्याचे सांगत पाटील यांना भीती घालण्यात आली. तसेच मुंबई पोलिस असल्याचे भासवून पाटील यांच्या बँक खात्याचीही माहिती घेतली. त्यानंतर विविध बँक खात्यांचे क्रमांक देऊन त्यावर रक्कम जमा करावी, अन्यथा अटक करण्यात येईल, अशी डिजिटल अरेस्टची धमकी दिली. त्यातून पाटील यांना वेगवेगळ्या बँक खात्यावरून 54 लाख 85 हजार 624 रुपये आरटीजीएसद्वारे विविध खात्यावर पाठविण्यास सांगून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.