

गडहिंग्लज : एका बहिणीच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशीच दुसरीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गडहिंग्लज तालुक्यातील नौकुड येथे घडली. सुशाबाई मारुती मांगले (वय 80) यांचे गुरुवारी निधन झाले. शनिवारी सकाळी त्यांच्या रक्षाविसर्जनाची तयारी सुरू असतानाच त्यांची सख्खी बहीण गौराबाई संताराम मांगले (वय 83) यांचेही निधन झाले. आयुष्यभर एकमेकींच्या सुख-दुःखात साथ देणार्या या दोन बहिणींच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.
नौकुड सुशाबाई यांच्या रक्षाविसर्जनाचा विधी शनिवारी पार पडणार होता. कुटुंबीय आणि नातेवाईक या विधीसाठी जमले असतानाच, सकाळी त्यांच्या सख्ख्या भगिनी आणि नात्याने जाऊबाई असलेल्या गौराबाई यांचे निधन झाले. एका बहिणीला अखेरचा निरोप देण्याची तयारी सुरू असतानाच, दुसर्या बहिणीनेही जगाचा निरोप घेतल्याने मांगले कुटुंबावर आणि नौकुड गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. रक्षाविसर्जनासाठी आलेल्या शोकाकुल आप्तेष्टांवर गौराबाईंच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्याची वेळ आली, हा प्रसंग हृदय पिळवटून टाकणारा होता. सुशाबाई यांच्या मागे मुलगा, मुली, नातवंडे आणि गौराबाई यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.